तेजस्वी यादव यांना निषेध मोर्चाचे नेतृत्व करताना ताब्यात घेण्यात आले.
आरजेडीचा ‘लोकभवन’वर मोर्चा : अनेक कार्यकर्त्यांवरही कारवाई
► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांच्या भगिनी मिसा भारती यांना पाटणा येथे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वात बिहारच्या ‘लोकभवन’वर (राज्यपालांचे निवासस्थान) बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चा अडवून पोलिसांनी आरजेडीच्य अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दुपारनंतर सर्वांची सुटका करण्यात आली. ‘नीट-युजी’ परीक्षेसंबंधीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवर काही आठवड्यांपूर्वी पोलिसांनी पाटणा येथे लाठीमार केला होता. त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. नीट परीक्षेसंबंधी आंदोलन करणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांवर एफआयआर नोंद करण्यात आले आहेत, ते मागे घेण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे. तरीही राष्ट्रीय जनता दलाचे नेते आंदोलन करीत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करीत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या हितासंबंधी कोणतीही चिंता नाही. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना केल्या असून भविष्यकाळात त्यांची फळे दिसून येतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले.
Comments are closed.