गांधीजींच्या आयुष्यातील ‘ते’21 दिवस; मनोज बाजपेयी साकारणार बापूंची भूमिका
बॉलिवूडमधील दमदार अभिनेते मनोज बाजपेयी आता त्यांच्या कारकिर्दीतील एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ते आगामी ऐतिहासिक चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे, मनोज बाजपेयी पहिल्यांदाच गांधीजींची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना दिसतील. दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि निर्माते अनुभव सिन्हा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
हा चित्रपट हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात अशा 21 दिवसांच्या कालखंडावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. हिंदुस्थान स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना दिल्ली सत्तेचे केंद्र बनत होती. मात्र, याच निर्णायक काळात महात्मा गांधींनी दिल्लीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामागील कारणे आणि त्या काळातील गांधीजींचा वैयक्तिक प्रवास चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी या चित्रपटाबाबत सांगितले की, इतिहासात या काळातील मोठ्या घटनांची नोंद आढळते; मात्र त्या घटनांच्या पडद्यामागे गांधीजींच्या मनात नेमके काय सुरू होते, याचा फारसा उल्लेख होत नाही. त्यामुळे चित्रपटातून त्या 21 दिवसांमधील त्यांच्या वैयक्तिक प्रवासाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गांधीजींनी दिल्लीपासून दूर जाण्याचा घेतलेला निर्णय हा माघार घेण्याचा नव्हता, तर स्वतःला नव्याने घडवण्याचा एक टप्पा होता, असा या चित्रपटाचा दृष्टिकोन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा केवळ ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपट नसून गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वातील एका वेगळ्या पैलूचा शोध घेणारी कथा असणार आहे.
या चित्रपटात मनोज बाजपेयींसोबत अभिनेते सौरभ शुक्ला यांचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे. मनोज बाजपेयी आपल्या विविधांगी अभिनयासाठी ओळखले जातात. त्यामुळे गांधीजींची भूमिका ते नेमक्या कोणत्या पद्धतीने साकारतात, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने अनुभव सिन्हा आणि सुधीर मिश्रा हे दोन दिग्गज चित्रपट निर्माते एकत्र आले आहेत.
Comments are closed.