भाईंदरच्या सोसायट्यांत बकरी पालन, कुर्बानीला बंदी; आवारात कुत्र्या-मांजरांना खायला घातल्यास पाच हजारांचा दंड
मीरा-भाईंदर शहरातील गृहनिर्माण सोसायट्या व गृहसंकुलांमध्ये बकरी पालन आणि कुर्बानीला बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी भटकी कुत्री, मांजरं आणि इतर प्राण्यांना खाद्य देण्यावर निर्बंध आणले आहेत. मीरा-भाईंदर पालिकेच्या महासभेत हा ठराव मंजूर केला. मांस विक्रीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार तर सार्वजनिक ठिकाणी भटक्या प्राण्यांना खाद्य देणाऱ्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या ठरावात करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदरमध्ये गेल्या काही वर्षांपासून सण-उत्सवांच्या काळात सोसायट्यांमध्ये बकरी आणण्यावरून वाद निर्माण होतात. एखाद्या रहिवाशाने सोसायटीच्या परिसरात बकरी आणल्यास इतर सभासदांकडून त्याला विरोध केला जात असल्याने अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होते. मे महिन्यातही या मुद्यावरून दोन गटांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी कारवाईसाठी स्पष्ट नियम नसल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर स्पष्ट नियमावली करण्याची मागणी होत होती. त्यानुसार मंगळवारी झालेल्या महासभेत मांसविक्री आणि बकरीचा सांभाळ-कुर्बानीसंदर्भातील नियमावलीचा प्रस्ताव चर्चेला घेण्यात आला. सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केला.
तीनवेळा नियमभंग झाल्यास परवाना रद्द
मांसविक्रीच्या दुकानाच्या दर्शनी भागात किंवा रस्त्यावरून सहज दिसेल अशा ठिकाणी जनावरांचे मांस अथवा अवयव लटकवून ठेवण्यास बंदी घालण्यात आली. असे आढळल्यास पहिल्यांदा २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तीनपेक्षा अधिक वेळा नियमभंग झाल्यास संबंधित विक्रेत्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
Comments are closed.