“मानव सुथारला IPL मध्ये जाऊ देऊ नका, गेला तर….” भारतीय कसोटी स्पेशालिस्टचे वक्तव्य

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी विजयात भारताचा युवा फिरकीपटू मानव सुथारने लक्षवेधी कामगिरी केली. गॉल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने 165 धावांनी विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27चा भाग असलेल्या या सामन्यात मानवने 10 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

केवळ दोनच कसोटी सामने खेळणाऱ्या मानवने उत्तम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 76 धावा देत 4 आणि दुसऱ्या डावात 55 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. 10 विकेट्स घेण्याची त्याच्या कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ आहे. अशा या युवा क्रिकेटपटूला जपले पाहिजे आणि त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) जाऊ देऊ नका, असे वक्तव्य भारताच्या माजी खेळाडूने केले आहे.

“सुथारला जपण्याचा प्रयत्न करा. यावर आधीही आपण चर्चा केली आहे. सर्वच युवा खेळाडूंना छोट्या फॉरमॅटमध्ये खेळायला आवडेल, मात्र भारताने त्याला कसोटी फॉरमॅटसाठी जपले पाहिजे. त्याला IPL मध्ये खेळायला आवडेल, हे खरे, मात्र त्याला तिकडे जाऊ देऊ नका. तसे त्याला IPL मध्ये खेळण्याची संधी मिळाली तर ठीक आहे, पण त्याने आपली शैली बदलू नये,” असे चेतेश्वर पुजाराने सोनी नेटवर्कवर म्हटले आहे.

पुजारा हा स्वत: एक कसोटी स्पेशालिस्ट राहिला आहे. त्याने भारताचे 103 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. तसेच त्याने त्याच्या कारकिर्दीत केवळ 30 IPL सामने खेळले. मागील वर्षीच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मानवचे IPL मध्ये खेळण्याबाबत पुजाराला कोणतीही अडचण नाही, मात्र तिथे त्याने आपली ताकद बदलू नये, असे त्याला वाटते.

सुथार IPL मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. तेथे त्याने आतापर्यंत केवळ पाच सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने दोन विकेट्स घेतल्या आहेत.

“मला नाही वाटत, सुथारला गोलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा व्हाईट बॉल क्रिकेटची गोष्ट येते तेव्हा केवळ फ्लॅट ट्रॅजेक्टरीची (चेंडूचा मार्ग सपाट) आवश्यकता असते. त्याच्या IPL खेळण्याबाबत अडचण नाही, मात्र त्याने त्याची बलस्थाने बदलू नये”, असेही पुजाराने पुढे म्हटले आहे.

पुजाराने मानवच्या गोलंदाजीचे कौतुक करताना म्हटले,”मानवची फिरकी गोलंदाजी आणि चेंडू हवेत टाकण्याची क्रिया फलंदाजांना मोठे शॉट्स खेळण्यास प्रवृत्त करते. जेव्हा तुम्ही त्याला पहिल्या डावात गोलंदाजी करताना पाहता, तेव्हा चेंडू नवा असतानाही त्याने हवेत फेकला आणि त्याने तो योग्य जागी टाकत होता. त्याची गोलंदाजी पाहता भारताला एक खरा डावखुरा फिरकीपटू सापडला आहे, जो दीर्घकाळ संघात राहिल.”

मानवने जून 2026 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मुल्लाणपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात तो सामनावीर ठरला होता. त्याने त्यावेळी पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात एक विकेट घेण्याची कामगिरी केली होती. (SL vs IND Test “Don’t let Manav Suthar go to IPL; if he goes, then says Cheteshwar Pujara)

Comments are closed.