शुबमन गिल टॉप-2 मध्ये, कोहली नाही तर ‘हा’ कर्णधार नंबर-1; पहिल्या 10 कसोटीत सर्वाधिक सामने जिंकणारे…

शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला. या विजयासह संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. गिलच्या कर्णधारपदाखालील भारताचा हा सहावा कसोटी विजय ठरला. या विजयासह, गिल पहिल्या 10 कसोटी सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
या बाबतीत गिलने माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मात्र, तो अद्याप या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचलेला नाही. चला तर मग पाहूया, कोणता भारतीय कर्णधार या यादीत अव्वल स्थानावर आहे.
पहिल्या 10 कसोटी सामन्यांनंतर भारतीय कर्णधाराने मिळवलेल्या सर्वाधिक विजयांच्या बाबतीत शुबमन गिलने सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. गांगुली आणि गिल या दोघांनीही त्यांच्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांत प्रत्येकी सहा विजय मिळवले आहेत.
गिलचा कर्णधार म्हणून प्रवास अजून बराच बाकी आहे. त्यामुळे भविष्यात त्याच्या विजयांच्या संख्येत आणखी भर पडेल अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, सौरव गांगुलीने भारताचे नेतृत्व करताना एकूण 49 कसोटी सामने खेळले. त्यापैकी भारताने 21 सामने जिंकले, 13 गमावले आणि 15 सामने अनिर्णित राहिले.
जरी भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय (40) मिळवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर असला, तरी कर्णधार म्हणून त्याची सुरुवात फारशी प्रभावी नव्हती. कोहलीने त्याच्या पहिल्या 10 कसोटी सामन्यांपैकी पाच सामने जिंकले होते.
रोहित शर्माची परिस्थितीही काहीशी अशीच होती. त्यानेही कर्णधार म्हणून पहिल्या 10 कसोटी सामन्यांत पाच विजय मिळवले होते. माजी भारतीय कर्णधार एमएस.धोनी या यादीत अव्वल स्थानावर आहे. धोनीने कर्णधार म्हणून पहिल्या 10 कसोटी सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आणि पहिले स्थान पटकावले.
पहिल्या 10 कसोटी सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार
एमएस धोनी-7
शुभमन गिल – ६*
सौरव गांगुली- 6
विराट कोहली – ५
रोहित शर्मा – ५
गाॅल येथील पहिली कसोटी जिंकल्यानंतर, आता कोलंबोमध्ये श्रीलंकेचा 2-0 असा पराभव करून मालिका निर्विवादपणे जिंकणे हे टीम इंडियाचे उद्दिष्ट आहे.
जर भारताने श्रीलंकेविरुद्धची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली, तर ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या गुणतालिकेतील त्यांचे स्थान अधिक मजबूत होऊ शकते. भारताच्या पुढील दोन कसोटी मालिका न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांविरुद्ध आहेत.
Comments are closed.