तुमचं मूल AI वापरत असेल तर पालकांनो सावधान! लक्ष ठेवा नाही तर…

हल्ली सगळ्याच मुलांच्या हातात मोबाईल आहे, इंटरनेट आहे आणि त्यासोबत एआयही आहे. अभ्यासाचा प्रश्न असो, एखादा प्रोजेक्ट असो, नवीन कौशल्य शिकायचं असो किंवा फक्त कुतूहल म्हणून एखादी भन्नाट गोष्ट जाणून घ्यायची असो, मुलं आता गुगलपेक्षा थेट एआयला विचारताना दिसतात. पण पालकांनो, तुम्ही कधी शांतपणे विचारलं आहे का, तुमचं मूल एआयला नेमकं काय विचारतं?

अनेक घटना आणि अनुभव समोर येत आहेत, ज्यातून मुलं Ai चा वापर केवळ अभ्यासापुरता करत नाहीत, हे लक्षात येतं. काही मुलं साहस, प्रयोग, धक्कादायक कल्पना, काल्पनिक प्रसंग किंवा इंटरनेटवर सहज न शोधाव्यात अशा प्रश्नांसाठीही एआयची मदत घेतात. जसं की फँटसी स्टोरी एखाद्याला मारण्याच्या आयडिया आणि बरच काही. प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर मूल त्याचा कसा अर्थ लावतं आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा वापर करतं, हा महत्वाचा मुद्दा आहे.

मुलं एआयला गृहपाठ, निबंध, प्रोजेक्ट, कोडिंग आणि भाषेचे प्रश्न विचारतात. हे चांगले उपयोग आहेत. पण त्याचबरोबर कुतूहलापोटी ते विविध प्रकारचे प्रश्नही विचारू शकतात. काही वेळा एआयने दिलेल्या उत्तराकडे मूल अंतिम सत्य म्हणून पाहू शकतं. इथेच पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. एआयने एखादी माहिती दिली म्हणजे ती नेहमीच अचूक असेल असं नाही.  म्हणून, पालकांनी मुलांना  एआयकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी करायला शिकणं गरजेचं आहे. विशेषतः विज्ञान, आरोग्य, सुरक्षितता किंवा प्रत्यक्ष प्रयोगांशी संबंधित माहिती असेल तर स्वतःहून प्रयोग करण्याआधी मोठ्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे अशी शिकवण द्यावी.

मुलांसोबत संवाद साधा
पालकांनी सतत मुलाचा फोन तपासण्यापेक्षा एआयचा वापर कशासाठी करतोस, तुला त्यातून काय शिकायला मिळतं, कोणत्या गोष्टी मजेदार वाटतात, असे सहज प्रश्न विचारले तर मुलंही मोकळेपणाने बोलू शकतात. एआयला काय विचारलं हे लपवण्याची गरज नाही, अशी भावना घरात निर्माण होणं जास्त महत्त्वाचं आहे.

Comments are closed.