कुंभमेळा कामांचा प्रोजेक्ट रिपोर्ट जनतेसमोर मांडा – पृथ्वीराज चव्हाण
कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा ३५ हजार कोटी रुपयांतून विकास होत असल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. सरकारने या कामांचा प्रोजेक्ट रिपोर्ट लोकांसमोर मांडून त्यावर जाहीर चर्चा करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
नाशिक येथे शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कुंभमेळा कामांचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे का, याची माहिती मी सरकारला, सचिवांना विचारणार आहे. याबाबत अधिकृत रिपोर्ट मागवा असे मी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांनाही सांगितले आहे. या रिपोर्टवर पुणे, मुंबई, दिल्लीच्या तज्ज्ञांकडून चर्चा व्हावी. हजारो कोटींच्या बोगस आकड्यांना कोणाला जबाबदार धरणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कुंभमेळा मंत्री हे घटनात्मक पद आहे का, असे नवीन खाते तयार केले आहे का, असे राज्यपाल कार्यालयाला विचारणार आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या अधिकारात नवीन मंत्रालय तयार केले आहे का, कॅबिनेटमध्ये तसा निर्णय झाला आहे का, हेही विचारावे लागेल, असे ते म्हणाले.
ठरावीक ठेकेदारांनाच कुंभमेळ्याची कामे दिली जातात, ४५ टक्क्यांपर्यंत कमिशनखोरी सुरू असल्याने निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. जनतेच्या पैशांची सुरू असलेली उधळपट्टी थांबविण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागेल, त्यासाठी जनतेने पुढे यावे. आपल्या पैशांचे काय झाले, हा जाब विचारण्याचा जनतेला अधिकार असून ते कर्तव्यसुद्धा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पस्तीस हजार कोटी रुपये खर्च होत असताना नाशिकला एकही मोठा प्रोजेक्ट नाही. विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेली मनमानी थांबविण्यासाठी येथे ‘जंतर मंतर’ करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. फोडाफोडी करून विरोधी पक्ष संपवणे, लोकशाही सोडून एकाधिकारशाही, हिटलरशाही आणण्याचे कारस्थान देशात सुरू असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कारभारामुळेच २०२९ ला देशात सत्तापरिवर्तन होईल, याची खात्री भाजपलाही झाल्यामुळे तेथे चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढचा चेहरा म्हणून अमित शहांना उपपंतप्रधान व्हायचे आहे. देशाला पूर्णवेळ शिक्षण मंत्री नाही, ते पार्टटाईम खाते नाही. परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ कमी करू शकणाऱ्या, शिक्षणाच्या मूलभूत प्रश्नांची माहिती असणाऱ्या शिक्षण मंत्र्यांची देशाला गरज असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
Comments are closed.