हिंदुस्थानचे जागतिक पदक निश्चित; ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद उपांत्य फेरीत दाखल

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानने आपले पहिले पदक निश्चित केले आहे. शुक्रवारी झालेल्या महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत हिंदुस्थानच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी चीनच्या जिया यिफान आणि झांग शू-शियान यांच्यावर विजय मिळवून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. हिंदुस्थानच्या या बिनमानांकित जोडीने चिनी जोडीला तब्बल ६९ मिनिटे कडवी झुंज दिली आणि १६-२१, २१-१५, २१-१३ असा विजय मिळवत पदकावर शिक्कामोर्तब केले.

१५ वर्षांचा दुष्काळ संपला हिंदुस्थानने तब्बल १५ वर्षांनंतर जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीचे पदक जिंकले आहे. यापूर्वी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या जोडीने लंडन येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. पहिल्या गेममध्ये पराभव झाल्यानंतरही ट्रीसा आणि गायत्री यांनी दमदार पुनरागमन करत १५ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला.

जिया यिफन ही चार वेळा चॅम्पियन आहे

चीनची जिया यिफान ही महिला दुहेरीतील दिग्गज खेळाडू आहे. तिने चार जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदके, तसेच ऑलिम्पिक सुवर्ण व रौप्यपदक जिंकले आहे. मात्र, तिने ही सर्व पदके चेन किंगचेनसोबत जिंकली होती. चेनने गेल्या वर्षीच्या अखेरीस निवृत्ती घेतल्यानंतर झांग शू-शियान ही जियाची नवीन जोडीदार बनली आहे.

ट्रीसा आणि गायत्री दोघींचे वय २३ वर्षे असून, गायत्री ही महान खेळाडू पुलेला गोपीचंद यांची कन्या आहे. चीनविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीवर दडपण आले होते; मात्र दुसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत त्यांनी पुढील दोन्ही सेट आपल्या नावे केले. दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने चिनी खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या दोन्ही जोड्यांना कांस्यपदक दिले जाते, त्यामुळे हिंदुस्थानचे कांस्यपदक निश्चित झाले आहे.

सात्विक-चिराग जोडीकडून अपेक्षाभंग

दुसरीकडे, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. सलग तिसरे पदक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग या जोडीने भारतीय जोडीचा अवघ्या ३६ मिनिटांत सरळ गेममध्ये पराभव केला.

पहिल्या गेममध्ये सात्विक आणि चिराग १६-१४ अशा आघाडीवर होते; मात्र भारतीय जोडीच्या चुकांचा फायदा घेत चिनी जोडीने १८-१८ अशी बरोबरी साधली व पहिला गेम २१-१८ ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ब्रेकपर्यंत चिनी जोडीने ११-५ अशी भक्कम आघाडी घेतली होती. चिरागकडून झालेल्या सर्व्हिसच्या चुकांमुळे भारतीय जोडीला आपली लय साधता आली नाही. चिनी जोडीने २१-९ असा दुसरा गेम सहज जिंकत सामना आपल्या नावावर केला.

Comments are closed.