एंडोस्कोपीचा कॅमेरा वापरून फोडला पेपर, छत्तीसगडमधील कृषी विद्यापीठाची परीक्षा रद्द, मास्टरमाइंड प्राध्यापकाला अटक
‘नीट’ पेपरफुटीवरून देशातील वातावरण ढवळून निघाले असताना छत्तीसगडमध्ये पेपरफुटीच्या घटनेने सर्वांची झोप उडवली आहे. एका प्राध्यापकाने चक्क एंडोस्कोपी करणाऱ्या कॅमेऱ्याने लिफाफ्यातील पेपर स्कॅन केला आणि तो पेपर फोडला. या प्राध्यापकाला अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दुर्ग येथे इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या बी.एस्सी. (कृषी) प्रथम वर्षाचा प्लँट पॅथॉलॉजी आणि दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरच्या कीटकशास्त्राचा पेपर फुटला आहे. या परीक्षा ७ आणि २० ऑगस्टला होत्या. विद्यापीठाशी संबंधित २८ कृषी महाविद्यालयांत ही परीक्षा होणार होती. मात्र, पेपर फुटल्याचे उघडकीस होताच परीक्षा रद्द करण्यात आली. या पेपरफुटीचा मास्टरमाइंड एक खासगी महाविद्यालयातील प्राध्यापक निघाला. योगेश सोनकेसरिया असे या प्राध्यापकाचे नाव असून तो २०१९ पासून भारती कृषी महाविद्यालयात प्राध्यापक आहे. त्याच्यासह ६ जणांना पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
परीक्षेच्या दोन तास आधी व्हॉट्सॲपवर दिला पेपर
विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधीच कीटकशास्त्राचा पेपर व्हॉट्सॲपवर मिळाला होता. पेपरचे फोटो आणि प्रश्न काही ग्रुप्सवर टाकण्यात आले. ते व्हायरल झाल्यानंतर पेपर फुटल्याचे विद्यापीठ प्रशासनाला कळले. याप्रकरणी दुर्ग येथील अनुज मिंज याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर मास्टरमाइंडला अटक करून संपूर्ण पेपरफुटीचा उलगडा करण्यात आला.
असा फोडला पेपर…
योगेश सोनकेसरिया हा वर्षभरापासून कॉलेजमधील उत्तरपत्रिका आणि परीक्षांचे पेपर घेण्यासाठी विद्यापीठात जात होता. १७ ऑगस्टला त्याने उत्तरपत्रिका महाविद्यालयात पोहोचवून पुढील परीक्षेचा पेपर ताब्यात घेतला. २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या कीटकशास्त्र विषयाचा पेपर तो घरी घेऊन गेला. पेपर सीलबंद लिफाफ्यात होता. योगेशने लिफाफ्यात छिद्र करून पेपर स्कॅन केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर पेपर हाताने लिहून काढला आणि त्याच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ११ हजार रुपयांमध्ये तो विकला.
Comments are closed.