पिंपळवंडीतील चिमुकलीची अत्याचार करून हत्या; जुन्नरमधील नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना पाठपुरावा करणार

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीतील एका साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीची गावातीलच एका नराधमाने अत्याचार करून निघृण हत्या केली. या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्यासह ठाण्यातील शिवसैनिकांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना या घटनेचा पाठपुरावा करील, अशी ग्वाही दिली.

पिंपळवंडी गावातील योगेश पवार हे आपल्या पत्नीसह शेतमजुरीसाठी गेले होते. त्यांची साडेनऊ वर्षांची मुलगी कांजण्या आल्याने घरीच होती. याचाच गैरफायदा घेत गावातील नराधमाने तिला पेरूचे आमिष दाखवले, त्यानंतर सायकलवरून गावापासून दूर शेतात नेले. तेथे त्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृण हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जुन्नर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. गावकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग बोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेची माहिती कळताच शिवसेना नेते राजन विचारे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसह पीडित कुटुंबीयांची पिंपळवंडीत जाऊन भेट घेतली.

कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या

राज्यात अनेक ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पुण्यातही नरसापूरची घटना ताजी असतानाच आता जुन्नरमधील या घटनेने महाराष्ट्र सुन्न झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळेच राज्यात कायदा, सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत, असा संताप राजन विचारे यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना प्रवक्ते अनिश गाढवे, शिवसेना जुन्नर विधानसभाप्रमुख आनंद रासकर, तालुका समन्वयक सौरभ डोके, उपजिल्हा युवा अधिकारी शांताराम सावंत, तालुका युवा अधिकारी मयूर गुंजाळ, शाखाप्रमुख अमोल हिंगे, आदेश घाटपांडे, संतोष कुऱ्हाडे, सनी भोर, प्रकाश गडगे, अभिषेक गवळी, अनिल गडगे, पी. के. कोकाटे, मुन्ना इनामदार, प्रशांत घोटणे, गणेश लेंडे, सादिक पठाण, महेश औटी, बाबू कदम, सुधीर हांडे, सचिन रासकर, उदय लेंडे, दिनेश झोडगे, विजय वामन उपस्थित होते.

Comments are closed.