संस्कृती-सोहळा – महाराष्ट्राच्या मातीतून विश्वाच्या प्रांगणात मंगळागौरीचा खेळ

>> वृंदा घोसाळकर

आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या काही आठवणी ज्या दूरदेशी आल्यानंतरही पुन्हा जगाव्याशा वाटतात. सख्यांसोबत धरलेला फुगडीचा ताल, मैत्रिणींसोबत रंगलेला झिम्मा, मंगळागौरीच्या निमित्ताने भारलेले वातावरण, साजरा साजश्रृंगार, आरास हे सारं कॅलिफोनिर्याच्या प्रांगणात अनुभवता येणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीतला हा जिवंतपणा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अमेरिकेतील फ्रिमॉन्ट येथे ‘गौराई खेळा’ हा मराठमोळा सांस्कृतिक सोहळा आज साकार होत आहे.

महाराष्ट्रापासून दूर राहूनही आपली संस्कृती, लोकपरंपरा अधिक लोकाभिमुख, सर्वसमावेशक व्हावी या उद्देशाने सादर होत असलेली ‘गौराई खेळा’ ही संकल्पना म्हणजे सहभागाने संस्कृती अनुभवण्याचे एक नवीन उदाहरण आहे. अमेरिकेच्या भूमीत मराठमोळा ‘गौराई खेळा’ हा सांस्कृतिक उपक्रम स्मिता कन्होडे, शीमा खानोलकर, वृंदा घोसाळकर, सुप्रिया सुकी, वैशाली शाह, वृषाली जोशी आणि सोनल पात्रे यांच्या संकल्पनेतून आकारास येत असून ही स्त्री शक्तीच या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळत आहे. नोकरी, व्यवसाय, घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळत या महिला या उपक्रमासाठी आपला वेळ, कौशल्य आणि कल्पना देत आहेत.

‘गौराई खेळा’मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीला खेळता येईल, नाचता येईल, परंपरेमध्ये सहभागी होता येईल आणि त्या आनंदाचा एक भाग बनता येईल. आपली समृद्ध लोकपरंपरा जगभरातील लोकांनी अनुभव्यात अशा आहेत. तरूण पिढीला आपली संस्कृती अनुभवता यावी, त्यांनी झिम्मा खेळावा, फुगडी घालावी, मराठी लोकसंगीत ऐकावे, महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची चव घ्यावी आणि या परंपरांची भावना समजून घ्यावी, यासाठी हा सोहळा आहे.

आज अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये ‘फ्रीमॉन्ट वेलकम्स गौराई खेळा’ या सांस्कृतिक उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या जागतिक शुभारंभाला आणखी एक विशेष महत्त्व लाभले आहे. फ्रीमॉंट शहराचे महापौर जयशालवान यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार असून Alameda County Commissioner सोनिया सालवान यांचीही विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच आपली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे या उपस्थित राहून त्यांच्या आठवणी, संस्कार, परंपरा आणि आपल्या मातीशी असलेले नाते उलगडणार आहेत. ‘फ्रीमॉन्ट वेलकम्स गौराई खेळा’ या विशेष कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या मातीतील या सांस्कृतिक संकल्पनेचे सिलिकॉन व्हॅलीतील विविध समुदायांमध्ये स्वागत होणार आहे. जगाच्या विस्तारलेल्या पटलावर आपली संस्कृती अनुभवताना नव्या पिढीला आपल्या इतिहासाशी आणि सांस्कृतिक स्मृतींशी प्रत्यक्ष जोडण्याचा प्रयत्नही या सोहळ्याद्वारे केला जात आहे. पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार ठरलेल्या व पुण्याच्या ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग असलेल्या शनिवारवाडय़ाची बारा फूट उंच भव्य प्रतिकृती या सोहळ्यानिमित्त उभारली आहे. मंगळागौरीची पारंपरिक पूजा आणि कथा, झिम्मा-फुगडीसह पारंपरिक खेळ, लोकनृत्य, लोकसंगीत, साडी-पैठणीचा कार्यक्रम, महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती अशा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे विविध पैलूंचा आनंद या सोहळ्यानिमित्त अनुभवता येईल.

महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचा वसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवत आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक करणे हाच ‘गौराई खेळा’ या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. तो अधिक विस्तारला जावा!

Comments are closed.