शरीरसौष्ठवाच्या वेडापायी ‘इंडियन रॉनी कोलमन’ सागर माळीने जीव गमावला
मूत्रपिंडाचा आजार बळावत असतानाही शरीरसौष्ठवावरील प्रेमापोटी उपचारांकडे दुर्लक्ष करणे मुंबईचा ‘इंडियन रॉनी कोलमन’ म्हणून प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू सागर माळीला जीवघेणे ठरले. अवघ्या 38व्या वर्षी त्याची आयुष्याशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. 2013मध्ये मुंबई श्रीचा किताब पटकावून शरीरसौष्ठव क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या सागरने 2014च्या मि. वर्ल्ड स्पर्धेत 85 किलो गटात चौथा क्रमांक मिळवला होता.
शरीर घडविण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या सागरने प्रकृतीच्या गंभीर संकेतांकडे दुर्लक्ष केले. डॉक्टरांनी त्याला शरीरसौष्ठव थांबवून उपचारांवर लक्ष देण्याचा सल्लाही दिला होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्यानंतर तो डायलेसीसवर होता, पण त्याने डायलेसीस आणि उपचारांकडे दुर्लक्ष करत मृत्यूला मिठी मारली. अखेर दोन वर्षांच्या झुंजीनंतर काल त्याने अखेरचा श्वास घेतला. पिळदार शरीरयष्टीने स्टेज गाजवणाऱया आपल्या मित्राचा निष्प्राण देह पाहण्याची वेळ शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गजांवर आली. मुलुंड येथील स्मशानभूमीत साश्रू नयनांनी सागरला अखेरचा निरोप दिला.
Comments are closed.