SLvsIND: ऋषभ पंतने रचला इतिहास! शुभमन गिलला ‘या’ यादीत टाकले मागे, ठरला WTC मध्ये सर्वाधिक धावा…

श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबो येथे मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (सोमवारी, 24 ऑगस्ट) ऋषभ पंत फलंदाजीला आला आणि अर्धशतकी खेळी करत इतिहास रचला. त्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल याला एका विक्रमामध्ये मागे टाकत पहिले स्थान काबीज केले आहे.

पंत पहिल्या दिवशी 3 धावांवर असताना रिटायर्ट हर्ट झाला. त्याने दुसऱ्या दिवशी फलंदाजीला येत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 21 वे अर्धशतक झळकावले. तो या डावात 89 चेंडूंत 6 चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 63 धावा करत बाद झाला आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ही कामगिरी करताना त्याने गिलला मागे टाकले आहे.

पंत आणि गिल या दोघांनी WTC मध्ये आतापर्यंत प्रत्येकी 42-42 सामने खेळले आहेत. पंतने गिलपेक्षा दोन डाव कमी खेळले, मात्र सर्वाधिक धावा पंतच्याच आहेत. गिलने 76 डावांमध्ये 2917 धावा केल्या आहेत. दुसरकडे पंतने 74 डावांमध्ये 2948 धावा करत गिलला मागे टाकले आहे.

पंत आणि गिल यांच्यानंतर WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचा क्रमांक लागतो. रोहितने 2716 आणि जडेजाने 2675 धावा केल्या आहेत. विराटने 2617 धावा केल्या असून तो यादीत पाचव्या स्थानी आहे.

रोहित आणि विराट दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून जडेजाला रोहितच्या पुढे जाण्याची संधी आहे. तसेच गिल आणि पंत यांच्यात या यादीत एक खास शर्यत दिसेल.

सध्या खेळत असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये, या यादीत यशस्वी जायस्वाल चौथ्या स्थानी आहे. त्याने WTCच्या 30 कसोटी सामन्यांत खेळताना 2588 धावा केल्या आहेत.

भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे (WTC मध्ये)
ऋषभ पंत – 2948* धावा (74* डाव)
शुभमन गिल – 2917 धावा (76 डाव)
रोहित शर्मा – 2716 धावा (69 डाव)
रवींद्र जडेजा – 2675 धावा (76 डाव)
विराट कोहली – 2617 धावा (79 डाव)

सामन्याची स्थिती
देवदत्त पडिक्कलने शतक तसेच गिल, पंत आणि ध्रुव जुरेल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 450 धावसंख्येचा टप्पा पार केला आहे. या सामन्यात पंतने जुरेलसोबत आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

पंत-जुरेलची भागीदारी श्रीलंकेतील कसोटी सामन्यात सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी 100+ धावांची भागीदारी नोंदवण्याची भारताची केवळ दुसरी वेळ आहे. याआधी 2015 मध्ये चेतेश्वर पुजारा आणि अमित मिश्रा यांनी 104 धावांची भागीदारी केली होती. (SL vs IND 2nd test Rishabh Pant makes history! Surpasses Shubman Gill to become india leading WTC run scorer)

Comments are closed.