पाच गोलांचा ‘धमाका’ करा; हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघासमोर अशक्याला शक्य करण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नेदरलँड्सकडून झालेल्या पराभवाने हॉकी विश्वचषकातील हिंदुस्थानी पुरुष संघाच्या उपांत्य फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचे उपांत्य फेरीचे समीकरण जवळजवळ हाताबाहेर गेले आहे; पण आशा अजून संपलेली नाही. कारण हॉकीच्या मैदानावर शेवटची शिट्टी वाजेपर्यंत सामना संपत नसतो. त्यामुळे आशेवर हिंदुस्थानी संघ जिवंत आहे. अर्जेंटिनाविरुद्ध पाच गोलांचा धमाका केला तर हिंदुस्थान उपांत्य फेरीचे स्वप्न पाहू शकतो.

हिंदुस्थानसमोर सोमवारी अर्जेंटिनाचे कडवे आव्हान असेल. या सामन्यात केवळ विजय मिळवणे पुरेसे ठरणार नाही, तर किमान पाच गोलांच्या फरकाने अर्जेंटिनाला धूळ चारावी लागणार आहे. त्याचवेळी दुसऱया सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडवर मात करणेही हिंदुस्थानच्या बाजूने जाणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टी जुळून येण्यासाठी हिंदुस्थानी हॉकीप्रेमींना देवाचा धावा करावा लागेल. कारण हिंदुस्थानी संघाच्या कामगिरीने ही गोष्ट शक्य नाही. सर्व योगायोग जुळून येणेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

कागदावर हे समीकरण अवघड आहे; जवळजवळ अशक्यच. पण मैदानावर अशक्याला शक्य करण्याची ताकद हिंदुस्थानच्या हॉकीत नेहमीच राहिली आहे. त्यामुळे आकडय़ांकडे पाहून खचण्याची नव्हे, तर आक्रमक हॉकी खेळून गोलांचा पाऊस पाडण्याची वेळ आली आहे.

अर्जेंटिनाविरुद्ध पहिल्या मिनिटापासून आक्रमण, प्रत्येक चेंडूवर ताबा आणि प्रत्येक संधीचे गोलमध्ये रूपांतर करणे हेच हिंदुस्थानला करावे लागणार आहे. पाच गोल म्हणजे केवळ आकडा नाही, तो हिंदुस्थानच्या पुनरागमनाचा महामंत्र असेल. हिंदुस्थानचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले असले तरी दरवाजा पूर्णपणे बंद झालेला नाही. संघाने धमाका करावा, गोलांचा धडाका लावावा आणि अशक्य गोष्टीचे शक्यतेत रूपांतर करावे, असे जबर आव्हान स्वीकारून मैदानात उतरावे लागणार आहे.

Comments are closed.