गॉलनंतर कोलंबोतही पडिक्कलचा जलवा; पडिक्कलचे सलग दुसरे कसोटी शतक, पहिल्या दिवशी हिंदुस्थान 5 बाद 300
देवदत्त पडिक्कलला श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दोनदा जीवदान दिलं आणि पडिक्कलने त्याची परतफेड चक्क 117 धावांचं शतक ठोकून केली. गॉलनंतर कोलंबोतही या देवदत्तने शतक झळकवत श्रीलंकन गोलंदाजीची पुन्हा एकदा धुलाई केली. हिंदुस्थानने पहिल्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर करताना 5 बाद 300 धावा उभारल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव ज्युरेल 7, तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते.
देवदत्त पडिक्कल परदेशातील सलग दोन कसोटींमध्ये शतक झळकवणारा 2018-19 नंतरचा हिंदुस्थानचा तिसऱया क्रमांकावरील पहिला फलंदाज ठरला. गॉल कसोटीत 167 धावा केल्यानंतर कोलंबोतही पडिक्कलने श्रीलंकेला पुन्हा सळो की पळो करून सोडले.
दोन जीवदानांचा श्रीलंकेला फटका
नाणेफेक जिंकून हिंदुस्थानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. यशस्वी जैसवालने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, लोकेश राहुल 18 धावांवर बाद झाला. लाहिरू कुमाराने त्याला डिकवेल्लाकरवी झेलबाद केले. त्यानंतर पडिक्कलला सुरुवातीलाच दोन जीवदान मिळाले. लाहिरू कुमारा आणि केशरा नुवान्थाच्या गोलंदाजीवर त्याचे झेल सुटले. या चुका श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगल्याच महागात पडल्या. जैसवालने 45 धावांची खेळी करत हिंदुस्थानला वेगवान सुरुवात दिली. मात्र 9 चौकार ठोकल्यानंतर असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर त्याच्याच यष्टीवर चेंडू आदळला. जैसवाल आणि फर्नांडो यांच्यात बाद झाल्यानंतर शाब्दिक चकमकही झाली; मात्र श्रीलंकेच्या कर्णधाराने हस्तक्षेप करून वाद शांत केला.
पंतला दुखापत; पडिक्कलचा शतकी जल्लोष
चहापानानंतर हिंदुस्थानला आणखी एक धक्का बसला. लाहिरू कुमारा याचा आखूड चेंडू ऋषभ पंतच्या मनगटावर आदळला. पंतला केवळ तीन धावा करता आल्या. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने पड्डिकलची साथ दिली. जाडेजाने काही आकर्षक फटके लगावत हिंदुस्थानची धावसंख्या वाढवली, तर पडिक्कलने शतकाकडे दमदार वाटचाल केली. अखेर प्रभात जयसूर्याच्या गोलंदाजीवर एक धाव घेत पडिक्कलने आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर केशरा नुवान्थाच्या फिरकीवर त्याचा त्रिफळा उडाला. पडिक्कलची 117 धावांची खेळी 74 धावांच्या भागीदारीनंतर संपली. यानंतर असिथा फर्नांडोने दुसऱया नव्या चेंडूचा फायदा घेत रवींद्र जाडेजाला 43 धावांवर त्रिफळाचीत केले.
अडचण–गिलची शतकी भागीदारी
जैसवाल बाद झाल्यानंतर पडिक्कल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. श्रीलंकेच्या गोलंदाजांना खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसल्याने दोघांनी संयमी फलंदाजी केली. पडिक्कलने अर्धशतक पूर्ण केले, तर गिलनेही आत्मविश्वासाने फलंदाजी करत आपले अर्धशतक झळकवले. दोघांनी तिसऱया विकेटसाठी 120 धावांची भागीदारी रचली. मात्र 50 धावांवर गिलने असिथा फर्नांडोच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर चुकीचा फटका मारला आणि यष्टिरक्षक निरोशन डिकवेल्लाकडे झेल देत माघारी परतला.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान पहिला डाव – 300 नंतर 5 (देवदत्त पडिक्कल 117, शुभमन गिल 50, यशस्वी जैस्वाल 45, रवींद्र जडेजा 43; असिथा फर्नांडो 3/46).
Comments are closed.