कल्याणमध्ये उद्या रानभाज्या महोत्सवाची मेजवानी
रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्रीची मेजवानी कल्याणकरांना मंगळवारी अनुभवायला मिळणार आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण आणि सुभेदार वाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. पावसाळ्यात निसर्गतः उगवणाऱ्या पोषक रानभाज्यांची शहरी नागरिकांना ओळख व्हावी हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
पाथरी, कुरडू, टाकळा, कुडा, अंबाडी, शेवगा, सुरण, लोथ आणि घोळ यांसारख्या अनेक रानभाज्यांची विक्री करण्यात येणार आहे. रासायनिक खताशिवाय नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या औषधी व पौष्टिक रानभाज्यांची चव कल्याणकरांना चाखता येणार आहे. पारंपरिक आणि दुर्मिळ खाद्यसंस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देणे, आदिवासी बांधवांना आणि स्थानिक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे हाच उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. येत्या मंगळवारी २५ ऑगस्टला कल्याण पश्चिमच्या लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्था येथे दुपारी ४ वाजता रानभाज्या आणि रानमेवा खरेदीसाठी अवश्य भेट द्या, असे आवाहन अध्यक्ष रमेश मोरे यांनी केले आहे.
Comments are closed.