क्रीडानगरीतून – कर्ण शर्माचा क्रिकेटला रामराम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा अनुभवी लेगस्पिनर कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल 20 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला त्याने आता पूर्णविराम दिला आहे. उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्सकडून खेळल्यानंतर कर्णने हा निर्णय घेतला. 25 ऑगस्ट रोजी लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर मेरठ मेव्हरिक्सविरुद्ध होणारा सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरणार आहे. 38 वर्षीय कर्णने हिंदुस्थानकडून एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड येथे त्याने कसोटी पदार्पण केले. आपल्या एकमेव कसोटीत त्याने दोन्ही डावांत प्रत्येकी दोन बळी घेतले.

'महाराष्ट्र केसरी' नागपुरात

पुणे – आगामी पुरुष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नागपूर येथे, तर महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाशिम येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने ही घोषणा केली आहे. या दोन्ही स्पर्धांच्या तारखा आणि ठिकाणांची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नागपूरला 2026-27 च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद वाशिमला देण्यात आले आहे.

हरयाणाला विजेतेपद

पुणे – हॉकी हरयाणाने दमदार पुनरागमन करत हॉकी झारखंडचा 2-1 असा पराभव करत 16 व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकी संघाचा पराभव केला. अंतिम सामन्यात झारखंडने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत 19 व्या मिनिटाला मुंद्री सरोजच्या गोलच्या जोरावर आघाडी घेत हरयाणाला धक्का दिला. मात्र हा धक्का फार काळ टिकला नाही. हरयाणाने 23 व्या मिनिटाला भव्याच्या पेनल्टी कॉर्नर गोलमुळे 1-1 अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्राच्या अखेरीस दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. तिसऱया क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये 42 व्या मिनिटाला खुशी हिने गोल करत हरयाणाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर ही आघाडी कायम राखत हरयाणाने जेतेपदावर कब्जा केला.

Comments are closed.