जयवीरचा वेग मयंकने रोखला, आशियाई ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेची रंगत वाढली
आशियाई ज्युनियर ओपन क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरीत अव्वल मानांकित मयंक चक्रवर्तीने जयवीर महेंद्रूची विजयी घोडदौड रोखत आपली दावेदारी अधिक भक्कम केली. रुई लोपेझच्या डावात मयंकने जयवीरला पराभवाचा धक्का दिला
या विजयासह मयंकने रशियाचा आर्टेम पिंगिन आणि शरणार्थी वीरेश यांच्यासह प्रत्येकी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडी घेतली. पिंगिनने अमनमुहम्मद होम्माडोव्हला, तर वीरेशने आयएम आदित्य धिंग्राला हरवले. जयवीरसह होम्माडोव्ह, विग्नेश अद्वैत वेमुला, माधवेंद्र प्रताप शर्मा आणि नंदीश व्ही.एस. प्रत्येकी चार गुणांसह त्यांचा पाठलाग करत आहेत.
मुलींच्या गटात प्रतीती बोरदोलोई आणि शोहरादोव्हा लेला यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे दोघींनी साडेचार गुणांसह संयुक्त आघाडी कायम राखली. तसेच आद्या गौडाने कीर्तिकाचा पराभव करत धक्कादायक विजयाची नोंद केली. या स्पर्धेच्या अद्याप चार फेऱया बाकी असल्याने आशियाई ज्युनियर विजेतेपदासाठीची बुद्धिबळाची लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.
Comments are closed.