Panvel news – ट्रेकिंगला गेले, वाट चुकले दैव बलवत्तर म्हणून वाचले
सुट्टीच्या दिवशी पनवेलमधील तीन तरुण चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले खरे पण वाट चुकल्याने ते भरकटले. एकीकडे पाऊस, निसरडी वाट, घनदाट झाडी यामुळे नेमके काय करावे हे त्यांना समजेना. अखेर एका तरुणाने ११२ क्रमांकावर पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच पोलीस चंदेरी किल्ल्यावर दाखल झाले आणि शोधमोहीम राबवून सर्वांची सुखरूप सुटका केली. ओम खिलारी, पार्थ कडवे व रुषिल वृंदावन अशी या तरुणांची नावे असून त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
ओम खिलारी, पार्थ कडवे आणि रुषिल वृंदावन हे तिघेही कामोठे येथील रहिवासी असून ते चंदेरी किल्ला, तामसई येथे ट्रेकिंगसाठी आले होते. मात्र डोंगरातील वाट चुकल्याने ते हरवले. पोलिसांनी रिटघर गावचे पोलीस पाटील दीपक पाटील तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे दुर्गसेवक गौरव दरवडा, मयूर टकले आणि आदेश पाडेकर यांच्या मदतीने शोधमोहीम राबवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि पोलीस नाईक मिलिंद जाधव यांनीही या मोहिमेत भाग घेतला. काही वेळातच तिन्ही तरुणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांना सुरक्षितपणे गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले. त्यानंतर पोलीसांनी तरुणांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पोलिसांच्या तत्परतेमुळे तीनही तरुण सुखरूप घरी परतले.
Comments are closed.