राधानगरीसह कोल्हापुरातील प्रकल्प तुडुंब, समाधानकारक पाऊस; ९२.१६ टीएमसी पाणीसाठा
अल् निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. तरीही उशिरा का असेना कोल्हापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. महापुराचे संकट टळले असून, सध्या जिल्ह्यातील ऐतिहासिक राधानगरी धरणासह सर्वच मोठी, मध्यम आणि लघु प्रकल्प, तलाव आदी पाणीसाठे तुडुंब भरले आहेत. ९३.७७ टीएमसी क्षमतेच्या एकूण १७ लहान-मोठ्या धरण प्रकल्पात सध्या ९२.१६ टीएमसी पाणीसाठा आहे.
प्रारंभी पावसाळा हंगामातील जूनचा अर्धा महिना झाला तरी सर्वत्र पाऊस दाखल झाला नसल्यामुळे जोरदार पावसाची प्रतीक्षा आणि पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्याने जूनअखेरीस पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला गेला होता. त्यामुळे येणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू करावा लागला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. सलग व संततधार पावसामुळे नद्या-नाल्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याचे पहावयास मिळाले होते.
धरणसाठ्यांतील सध्याची पाणीपातळी टीएमसीमध्ये कंसात टक्केवारी
राधानगरी ८.२७ (९९ टक्के), तुळशी ३.४६ (१००), वारणा ३३.६७ (९८), दूधगंगा २५.२० (९९), कासारी २.६६ (९६), कडवी २.५२ (१००), कुंभी २.६३ (९७), पाटगाव ३.५८ (९५), चिकोत्रा १.२९ (८५), चित्री १.८९ (१००), जंगमहट्टी १.२२ (१००), घटप्रभा १.५४ (९९), जांबरे ०.८२ (१००), आंबेओहोळ १.२४ (१००), सर्फनाला ०.६७ (१००), धामणी १.२९ (३४) आणि कोदे लपा ०.२१ (१००) टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणांतून सुरू असलेला विसर्ग
राधानगरी धरणातून १४०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर वारणा १४०० क्युसेक, दुधगंगा १२००, कासारी २५०, कडवी २२०, कुंभी ३००, चित्री १८०, घटप्रभा ९०० क्युसेक तर जांबरे धरणातून २५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
Comments are closed.