वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करून ट्रॅक्टर पळवला, चिंचोली भोसे येथील १४ जणांवर गुन्हा दाखल; जेसीबी, ट्रॅक्टरसह ५३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे येथील भीमा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळूउपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर वाळूमाफियांनी हल्ला केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वाळूतस्करांनी काठीने व हाताने मारहाण करत वाळूने भरलेला ट्रॅ क्टर पळवून नेला. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५३ लाख ३० हजार रुपयांचा जेसीबी, ट्रॅक्टरसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
बालाजी लक्ष्मण पवार, अनिल लक्ष्मण पवार, लहु जगन्नाथ कारंडे, आबा जगन्नाथ कारंडे, प्रदीप उर्फ बाळु मच्छिंद्र पवार, सुरज शिंदे, रेवन श्रीमंत पवार, अक्षय चांगदेव पवार, शंकर नवगिरे, गणेश बापू सोनवणे, किशोर शिवदास आवटे, सतीश भुई, करण नाईकनवरे, बबलु नवगिरे (सर्वजण रा. चिंचोली भोसे, भटुंबरे, ता. पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या वाळू तस्करांची नावे आहेत.
चिंचोली भोसे हद्दीत वाळूचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानुसार २२ ऑगस्ट रोजी पहाटे पंढरपूर तालुका पोलिसांचे पथक भीमा नदी पात्राजवळ कारवाईसाठी गेले होते. यावेळी पोलीस पथकाने वाळूने भरलेला एक ट्रॅक्टर अडवला असता, चालकाने उडी मारून पळ काढला. त्यावेळी इतर पोलीस कर्मचारी नदीपात्रात पाहणी करण्यासाठी गेले असता, ट्रॅ क्टरजवळ एकटे असलेल्या पोलिसाला आरोपी बालाजी पवार आणि त्याच्या साथीदारांनी घेरले. ‘तू मला ओळखत नाही का? तुला लय माज आला आहे का? हा माझा ट्रॅक्टर आहे’, असे म्हणत बालाजी पवार याने काठीने मारहाण केली. तसेच वाळूने भरलेला ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली पळवून नेली.
या घटनेनंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून नदीपात्रात छापा टाकला आणि बेकायदेशीरपणे वाळूउपसा करणारी ट्रॅक्टर व ट्रॉ ली (१ ब्रास वाळूसह) किंमत ७ लाख, स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली (१ ब्रास वाळू) किंमत ६ लाख, सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली (१ ब्रास वाळूसह) किंमत ७ लाख, महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर व ट्रॉली (१ ब्रास वाळूसह) किंमत ७ लाख, पिवळ्या रंगाची जेसीबी किंमत २० लाख रुपये, पळवून नेलेला ट्रॅक्टर व ट्रॉली (१ ब्रास वाळूसह) किंमत ६ लाख असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments are closed.