पब पहाटेपर्यंत, मग डीजेवर निर्बंध का? गणेशोत्सव बैठकीत कार्यकर्त्यांचा पोलिसांना सवाल

पुणे शहरातील पब आणि बार पहाटेपर्यंत बिनदिक्कत सुरू राहतात, तेव्हा पोलिसांना नियम आठवत नाहीत का? मग शतकोत्तरी परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देखावे, ध्वनिव्यवस्था, डीजे आणि मिरवणुकांवरच वेळेचे जाचक निर्बंध का लादले जातात? असा संतप्त सवाल गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस व महापालिका प्रशासनाला विचारला. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या संयुक्त बैठकीत नियमांच्या दुटप्पीपणावरून कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

महापालिकेत आयोजित या बैठकीस महापौर मंजूषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते नितीन गावडे, काँग्रेसचे गटनेते चंद्रकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्यासह पोलीस व महापालिका अधिकारी आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र रोष व्यक्त केला. पार्त्या आणि पब संस्कृतीला सूट आणि भाविकांच्या श्रद्धेच्या उत्सवावर निर्बंध, हा कोणता न्याय? असा जाब विचारत दहीहंडी व गणेशोत्सवात रात्री १२ वाजेपर्यंत आणि विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शेवटपर्यंत डीजे व ध्वनिव्यवस्थेला परवानगी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

युवासेनेचे शहर अधिकारी युवराज पारीख यांनी आक्रमक भूमिका मांडत, पोलिसांकडून हद्दीच्या नावाखाली कार्यकर्त्यांची अडवणूक केली जाते. कडक निर्बंधांमुळे मंडळांनी जिवंत देखावे करणे बंद केले असून केवळ विद्युतरोषणाई उरली आहे. हा उत्सव पूर्णपणे निर्बंधमुक्त करा, अशी मागणी केली. शिवसेना पुणे सहसंपर्क गजानन थरकुडे यांनी निबंधमुक्त उत्सवाच्या मागणीला पाठिंबा दिला, तर अॅड. रूपाली ठोंबरे यांनी नियम बदलून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे थांबवावे, असा इशारा दिला.

सहपोलीस आयुक्त संजय दराडे म्हणाले, यंदाच्या उत्सवात एकूण ५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला शिथिलता देण्यात आली आहे. लेझर बीम व प्लाझ्माचा वापर टाळण्याबाबत मंडळांशी समन्वय साधला जाईल. दहीहंडीला रात्री बारापर्यंत परवानगीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत. याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करावा. त्यांच्या आदेशाचे पालन केले जाईल.

महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही, अशी एसओपी असेल; पण जाचक बंधने नसतील. विसर्जन मार्गावरील रस्त्यांचे खड्डे बुजविणे, झाडांच्या फांद्या छाटणे, लटकत्या तारा हटविणे, फिरती स्वच्छतागृहे व हिरकणी कक्ष उभारण्याचे निर्देदेश त्यांनी दिले. तसेच जाहिरात कमानी, स्टॉल्सवरील शुल्क व दंडाला पूर्ण माफी देत ऑनलाइन एक खिडकी आणि डिजिटल मॅपिंगची घोषणा केली.

डीजेची तक्रार करणाऱ्या बापटांना ओढत बाहेर काढले

बैठकीत नारायण पेठेतील विद्यानंद बापट यांनी डीजेच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करताच सभागृहात मोठा गोंधळ उडाला. संतप्त गणेश मंडळांचे कार्यकर्ते बापट यांच्या अंगावर धावून गेले. वातावरण चिघळल्यानंतर सुरक्षारक्षकांनी बापट यांना अक्षरशः ओढत सभागृहाबाहेर काढले. या प्रकारावर महापौर मंजूषा नागपुरे म्हणाल्या, ‘मी व्यासपीठावर ज्या ठिकाणी बसले होते, तिथून मला हा प्रकार दिसला नाही. नेमके काय घडले, याची माहिती घेऊन तपासावे लागेल.

लेझर-प्लाझ्माला मंडळांकडून स्वयंस्फूर्त नकार

गणेशोत्सवात नागरिकांच्या डोळ्यांना त्रासदायक ठरणारे लेडार बीम आणि प्लाझ्मा दिवे न वापरण्याची तयारी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत दर्शविली. लेझर-प्लाइमाबाबत संदिग्धता राहू नये आणि पोलिसांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी रवींद्र माळवदकर व महेश सूर्यवंशी यांनी केली.

डिजिटल मॅपिंगमुळे एका क्लिकवर देखाव्यांची माहिती

यंदाचा गणेशोत्सव डिजिटल करण्यासाठी शहरातील सर्व गणेश मंडळे आणि देखाव्यांचे डिजिटल मॅपिंग केले जाणार आहे. मंडळाचे अचूक ठिकाण, देखाव्याचा प्रकार आणि तेथे पोहोचण्याचा मार्ग महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी क्यूआर कोडची सुविधाही देण्यात येईल. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना देखावे शोधणे सोपे होणार असून, कोणतेही मंडळ दुर्लक्षित राहणार नाही. गर्दीचे नियोजन आणि पोलीस बंदोबस्तासाठीही या डिजिटल माहितीचा उपयोग होईल, अशी ग्वाही महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.

उत्सवासाठी निधी द्या; महापालिकेच्या एफडी मंडळांसाठी वापरा धीरज घाटे

गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळांचे कार्यकर्ते वर्षभर सामाजिक उपक्रम राबवितात. मात्र, उत्सवासाठी दरवर्षी त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने गणेश मंडळांना स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा. महापालिकेकडे मुदत ठेवी (एफडी) असतील, तर त्यातील निधी अथवा उत्पन्न मंडळांच्या सुविधांसाठी वापरावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक धीरज घाटे यांनी केली.

Comments are closed.