उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांनाही सवलती द्या – शरद पवार

‘देशातील बड्या उद्योगपतींचे व्याज माफ करून कर्जाचे हप्ते वाढवून दिले जातात. त्याचप्रमाणे काळ्या आईची ‘प्रामाणिक’ सेवा करणारा शेतकरी सक्षम व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने त्यांनादेखील या सवलती दिल्याच पाहिजेत,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ‘सत्तेत नसलो तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत राहणार. कारण आमची बांधिलकी शेती आणि शेतकऱ्यांशी आहे,’ अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघातर्फे आयोजित ‘६६व्या वार्षिक अधिवेशना’चे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार सुनील कर्जतकर, कल्याणराव पाटील, ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष विलास शिंदे, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद, अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, उपाध्यक्ष भीमसेन कोकरे, बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण, मध्यवतर्ती संशोधन

समितीचे अध्यक्ष अभिषेक कांचन, विभागीय अध्यक्ष सुरेश कडलग आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘पर्यावरण, हमीभाव यांसह अन्य अनेक समस्या शेतीपुढे उभ्या ठाकल्या असल्याने आता शेतीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. १९४७ साली देशामध्ये ८० टक्के लोक शेती करून उदरनिर्वाह भागवत होते. मात्र, वाढते महामार्ग, रेल्वे यांसह विविध प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र घटू लागले आहे. एकीकडे शेतीचे क्षेत्र घटत असले, तरी शेतीवर अवलंबून असणाऱ्या वर्गाची संख्या मात्र वाढत आहे.

त्यामुळे शेती ही आर्थिकदृष्ट्या अडचणीची होऊ लागली आहे. त्यामुळे उपलब्ध शेतीमध्ये शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून उत्तम शेती करण्याची गरज आहे.’ बऱ्याच कंपन्या ‘ऑरगॅनिक’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी खरेदी केलेल्या औषधांचा पिकावर काही परिणाम झाला नाही, अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतात. असा बनावट औषधांवरदेखील केंद्र सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा बनावट औषधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात,’ असे पवार म्हणाले.

कोकाटे म्हणाले, ‘कृषिमंत्री असताना सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या हिताचे ५५ अध्यादेश मी काढले होते. मात्र, निधीअभावी राज्य सरकारने ते अजून लागू केले नाहीत. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यलयाच्या परिसरात एक हवामान केंद्र असावे, हा निर्णय माझ्या कार्यकाळात झाला. तो मंजूरदेखील झाला. मात्र, अंमलबजावणी झाली नाही.’

माजी कृषिमंत्री कोकाटेंचा सरकारला ‘घरचा आहेर’
‘या देशातील ५५ ते ६० टक्के वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे. मात्र, या ६० टक्के लोकांसाठी सरकार पाहिजे तेवढे काम करत नाही. त्यामुळेच शेतकरी शेतीमधून बाहेर पडण्याचा विचार करू लागले आहेत. राज्य सरकारने समृद्धी महामार्गासाठी ७५ हजार कोटी खर्च केले. शक्तिपीठ महामार्गासाठी एक लाख कोटींची तरतूद केली. मग शेतकऱ्यांसाठी पाच हजार कोटी रुपये देण्याची तयारी का नाही? सरकार आहे की काय आहे?’ असा सवाल करत माणिकराव कोकाटे यांनी सरकारला ‘घरचा आहेर’ दिला.

Comments are closed.