Home Safety: वृद्धांसाठी सेफ होम टिप्स

वय वाढल्यानंतर घरातील अगदी रोजच्या वापराच्या गोष्टीही कधी कधी धोकादायक ठरू शकतात. बाथरूममधील ओलसर फरशी, अंधारात न दिसणारा जिना, कार्पेट किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंमुळे पडण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वृद्ध आई-वडिलांसाठी घराची रचना करताना फक्त सोय नाही, तर सुरक्षिततेलाही तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. म्हणूनच, त्यांच्या सुरक्षिततेसाठी जाणून घेऊयात सेफ होम टिप्स

सुरक्षित स्नानगृह
बाथरूममध्ये ओलसरपणामुळे घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे कमोडजवळ आणि शॉवरच्या परिसरात मजबूत ग्रॅब बार्स बसवता येतात. शक्य असल्यास घसरणार नाही अशी मॅटही बसवा.

पुरेसा प्रकाश
रात्री उठताना अंधारामुळे अडखळण्याचा धोका असतो. बेडपासून बाथरूमपर्यंतचा मार्ग पुरेसा प्रकाशमान ठेवा. बेडजवळ सहज पोहोचेल अशा ठिकाणी नाईट लॅम्प किंवा स्विच ठेवणे उपयोगी ठरते.

कार्पेटची ठेवण
घरातील सैल गालिचे, चटया किंवा जमिनीवर पसरलेल्या इलेक्ट्रिक वायर अडथळा ठरू शकतात. त्यामुळे शक्य तितक्या वस्तू व्यवस्थित सुरक्षित करा आणि चालण्याच्या मार्गात अनावश्यक वस्तू ठेवू नका.

रोजच्या वस्तू
जड वस्तू किंवा रोज लागणाऱ्या वस्तू खूप उंच कपाटात ठेवू नका. त्यासाठी वृद्ध व्यक्तींना सहज हात पोहोचेल अशी जागा निवडा. वारंवार स्टूल किंवा खुर्चीवर चढण्याची गरज पडणार नाही, याची काळजी घ्या.

जिन्याची विशेष काळजी
जिन्याच्या दोन्ही बाजूंना शक्य असल्यास मजबूत रेलिंग असावे. पायऱ्यांवर पुरेसा प्रकाश असावा आणि तिथे वस्तू ठेवणे टाळावे. पायऱ्या ओलसर किंवा घसरणाऱ्या राहणार नाहीत याचीही काळजी घ्या.

स्वयंपाकघरातील सुरक्षितता
गॅस, गरम भांडी आणि धारदार वस्तूंची मांडणी काळजीपूर्वक करा. जड भांडी खालील कप्प्यात आणि वारंवार वापराच्या वस्तू सहज पोहोचतील अशा ठिकाणी ठेवणे अधिक सोयीचे ठरते.

बेडरूम सुरक्षितता
बेडची उंची खूप जास्त किंवा खूप कमी नसावी. बेडजवळ फोन, पाण्याची बाटली आणि रात्री लागणाऱ्या वस्तू सहज पोहोचतील अशा ठिकाणी ठेवा. रात्री उठताना जमिनीवर चप्पल किंवा इतर वस्तू विखुरलेल्या नसाव्यात.

Comments are closed.