पुन्हा स्वप्नभंग! हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत अर्जेंटिनाकडून पराभूत; उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर, 51 वर्षांची प्रतीक्षा सुरूच….

भारतीय पुरुष हॉकी संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आणि 51 वर्षांपासूनची प्रतीक्षा सुरूच आहे. सोमवारी (24 ऑगस्ट) ऍमस्टेलवीन येथे अर्जेंटिनाने भारताचा 5-3 असा पराभव केला. या पराभवानंतर भारत या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. तसेच या विजयामुळे अर्जेंटिनाने भारताविरुद्धच्या आपल्या विजयांची आघाडी पाच सामन्यांपर्यंत वाढवली.

पुढील फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना किमान दोन गोलांच्या फरकाने जिंकायचा होता, मात्र झाले उलटेच. अर्जेंटिनाकडून तोमास डोमेनने दोन गोल केले, जाकिन तोस्कानी, निकोलस डेला टोरे आणि लुकास तोस्कानी यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. भारताकडून सूखजीत सिंगने दोन आणि हार्दिक सिंगने एक गोल केला.

या स्पर्धेत भारताचा पुढील सामना बेल्जियमविरुद्ध असेल, जो सातव्या ते आठव्या स्थानासाठीचा आहे. दुसरीकडे अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यासाठी त्यांना या सामन्यातील विजयाबरोबरच इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड्स सामन्याच्या निकालाचाही फायदा झाला. हा सामान 2-2 असा बरोबरीत राहिल्याने नेदरलॅंड्सने ई गटाच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आणि उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले.

भारताच्या सामन्याची स्थिती पाहिली तर सुरूवातीपासूनच अर्जेंटिनाने आपली पकड मजबूत केली होती. त्यांनी पहिल्याच मिनिटाला गोल करत आघाडी मिळवली आणि सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर डेला टोरेने ही आघाडी दुप्पट केली.

या सामन्यात भारताचा पहिला गोल दहाव्या मिनिटाला झाला. सुखजीतने हा गोल केला. त्यामुळे सामना 2-1 असा झाला असता अर्जेंटिनाने आणखी दोन करत आघाडी 4-1 अशी मजबूत केली. डोमेनने हे गोल 33 व्या आणि 45 व्या मिनिटाला केले.

सामन्याच्या 53 व्या मिनिटाला अर्जेंटिनाने पुन्हा एक गोल केला. तीन भारतीय डिफेंडर्सनी वेढलेला असतानाही लुकास तोस्कानीने दमदार शॉट खेळत हा गोल केला. भारताचा दुसरा गोन 58 व्या मिनिटाला आला. त्यानंतर लगेचच पुढच्या मिनिटाला हार्दिकने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला, मात्र निकाल अर्जेंटिनाच्या बाजूने लागला.

भारताने शेवटी कधी जिंकला होता विश्वचषक?
भारतीय हॉकी संघाने शेवटी विश्वचषक 1975 मध्ये जिंकला होता. क्वालालंपूर येथे पाकिस्तानला हरवून विश्वचषक जिंकल्यापासून भारताला त्यानंतर कधीही विश्वविजेते पदक मिळवता आले नाही. यावेळीही त्यांच्या पदकाच्या आशा अपूर्ण राहिल्या आणि त्यांचा 51 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळही कायम राहिला.

Comments are closed.