SL vs IND: ध्रुव जुरेलने आपल्या शतकाचे श्रेय कोणाला दिले? म्हणाला, “जेव्हा जेव्हा मी सिराजशी बोलतो…”

कोलंबोमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. 23 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात 500 धावसंख्येचा डोंगर रचला. यामध्ये भारताकडून देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जुरेल 115 धावांवर नाबाद राहिला. त्याने त्याच्या शतकाचे श्रेय मोहम्मद सिराजला दिले. तसेच ऋषभ पंतचा सल्ला कसा कामी आला याबाबत सांगितले आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता जुरेलने पत्रकार परिषदेत त्याच्या शतकाबद्दल वक्तव्य केले आहे. “जेव्हा जेव्हा मी सिराजशी बोलतो, तेव्हा मला वाटते की तो शतकापेक्षा सेलिब्रेशन अधिक करतो. तो जोरदार बचाव करत होता, त्यामुळे सर्व ठीक होते”, असे जुरेल म्हणाला.
“फलंदाजी करताना मी केवळ भागीदारी करण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रशिक्षक आणि कर्णधार नेहमी सांगतात त्याप्रमाणे, परिस्थिती आणि स्थितीचा आढावा घ्या, संघाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजून घ्या, पूर्ण ताकदीने खेळा,” असे देखील जुरेलने पुढे म्हटले आहे. यावेळी त्याने पंतच्या सल्ल्याचा त्याला कसा फायदा झाला हेही उघड केले आहे.
जुरेल म्हणाला, “पंत हा किती जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याने ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये भारतासाठी काय कामगिरी केली आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे, जेव्हा तो संघात असतो तेव्हा मी प्रामुख्याने त्याचाच सल्ला घेतो, कारण त्याच्याकडे खूप अनुभव आहे. विशिष्ट परिस्थितीत मी काय करावे, याबद्दल मी नेहमीच त्याचा सल्ला घेतो.”
“कसोटीमध्ये प्रत्येकाची फलंदाजीची शैली वेगळी असते. पंत वेगळ्या पद्धतीने खेळतो आणि अनेक शॉट्स मारतो. मी तसा नाही खेळू शकत, त्यामुळे मी ज्याप्रमाणे खेळत आलो आहे, त्या माझ्या गेम प्लॅनला चिटकून राहण्याचा प्रयत्न करतो,” असे सांगताने जुरेलने पंतच्या सल्ल्यामुळे त्याच्या फलंदाजीला कसा आकार मिळाला हे स्पष्ट केले आहे.
99 धावांवर असतानाच्या तणावपूर्वक क्षणाबाबत जुरेल म्हणाला, “जेव्हा मी तो शॉट खेळलो, तेव्हा चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला आणि मला वाटले आता धावा काढता येईल, मात्र जेव्हा त्याने तो चेंडू पकडला तेव्हा मी मनात म्हटले , ‘हे देवा. कृपया मला वाचव’.”
या सामन्याच्या भारताच्या पहिल्या डावात पंत आणि जुरेल यांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. पंत 63 धावा करत बाद झाला. कर्णधार शुभमन गिलने भारताचा पहिला डाव 503 धावसंख्येवर 9 विकेट्स असताना घोषित केला. (SL vs IND 2nd test Dhruv Jurel credit his century to mohammed Siraj also talks about rishabh pant helpful advice)
Comments are closed.