पंढरपूर न्यूज – रक्षाबंधनानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेने पारंपरिक दागिने परिधान केले.
राखी पौर्णिमेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसत होते.
श्री विठ्ठलास सोन्याचा नक्षी टोप प्रभावळ असलेला, कौस्तुभ मणी, हिऱ्याचे कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठे, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मारवाडी पेट्यांचा मोत्याचा हार, मत्स्य जोड, सोने पितांबर, तुळशीची माळ एक पदरी, सोन्याची राखी, बाजीराव कंठी आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
रुक्मिणी मातेस, सोन्याचा मुकुट, वाक्या तोडे, तोडे जोड, तारवड जोड, जवमणी पदक, चिंचपेटी तांबडी, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
Comments are closed.