विद्याविहार ते ठाणेदरम्यान उद्या साडेपाच तासांचा ब्लॉक; लोकलच्या जलद मार्गावरून धावणार एक्स्प्रेस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर (मेन लाईन) आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गिकेवर विद्याविहार आणि ठाणेदरम्यानच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक असेल. ब्लॉकच्या काळात लोकल ट्रेनच्या जलद मार्गावरून मेल-एक्स्प्रेस गाड्या धावतील. टिटवाळ्यातील १५ दिवसांच्या ब्लॉकबरोबरच हा मेगाब्लॉक घेतला जात असल्याने मेल-एक्स्प्रेससह जलद लोकलचे वेळापत्रक कोलमडून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १.३० या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत ‘डाऊन’ मेल-एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर ‘डाऊन जलद’ मार्गावर वळवल्या जातील व ठाणे स्थानकावर पुन्हा पाचव्या मार्गावर वळवल्या जातील. तसेच ‘अप’ मेल-एक्स्प्रेस ठाणे स्थानकावर ‘अप जलद’ मार्गावर वळवल्या जातील आणि लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचणार आहेत. या लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच लोकल सेवेचे वेळापत्रकही कोलमडणार आहे. सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत, पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेससह अनेक गाड्यांना ‘लेटमार्क’ लागेल.

  • ट्रान्स हार्बर मार्ग: ट्रान्स-हार्बर मार्गावर रविवारी ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात ठाणे व वाशी/नेरूळ/पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील. सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत ठाणे येथून वाशी/नेरूळ/पनवेलकडे जाणाऱ्या लोकल तसेच सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत पनवेल/नेरूळ/वाशी येथून ठाणे येथे येणाऱ्या फेऱ्या रद्द राहतील.

Comments are closed.