18 कोटींचा रस्ता सहा फूट खोल खड्ड्यात; तीन महिन्यांतच सारणी-उर्से-ऐना रस्त्याची दैना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डहाणूतील सारणी-उर्से-ऐना रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्ता खचला असून अक्षरशः या मार्गाची दैना झाली आहे. तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यांतच मोठे भगदाड पडले आहे. ठेकेदाराचा ट्रक रस्त्यातील सहा फुट खड्ड्यात अडकल्यामुळे निकृष्ट कामाचा भंडाफोड झाला.

डहाणू तालुक्यातील सारणी-उर्से-ऐना हा मार्ग जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण करण्यात आला. मात्र रस्ता पूर्ण होऊन अवघे तीन महिने उलटत नाहीत तोच रस्त्याचा काही भाग खचून मोठे भगदाड पडले. खड्ड्यामुळे या मार्गावरचा प्रवास धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे या भगदाडाच्या बाजूलाच कामासाठी आलेला ठेकेदाराचा अर्धा ट्रक रस्त्यात फसला. त्यामुळे रस्त्याची बांधकाम गुणवत्ता आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाच हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ठेकेदारावर कारवाईची मागणी

सारणी-उर्से-ऐना रस्त्याचे काम विक्रमगड येथील जिजाऊ कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने केले आहे. १८ कोटींचा निधी खर्च करून तयार केलेला रस्ता तीन महिन्यांतच खचल्याने या संपूर्ण कामाची गुणवत्ता, देखरेख आणि अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या तपासणीची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.