सोनिया गांधींचे ‘बिलाँगिंग’ पुस्तक छापण्यास ‘पेंग्विन’चा नकार; काही भाग हटवण्यासाठी मोदी सरकारकडून दबाव, काँग्रेसचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र भारतात प्रकाशित न करण्याचा निर्णय ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ या प्रकाशन संस्थेने घेतला आहे. पुस्तकातील एका भागामध्ये काही संपादकीय बदल करण्याची मागणी प्रकाशकांनी केली होती; मात्र लेखिकेने ती मागणी फेटाळल्यामुळे पुस्तक प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून, मोदी सरकारकडून यासंदर्भात दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांनी लिहिलेले ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार होते. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत एक लाख प्रती छापल्या जाणार होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पुस्तकाच्या एका भागातील हस्तलिखिताच्या मजकुरात बदल करण्याची आणि काही भाग हटवण्याची मागणी प्रकाशकांनी लेखिका सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी त्यास परवानगी दिली नाही; त्यामुळे ‘पेंग्विन’ने हे पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. ‘पेंग्विन’ने मात्र हे वृत्त फेटाळले आहे, तर सोनिया गांधींचे प्रतिनिधी डेव्हिड गॉडविन यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

ॲमेझॉनवर पुस्तकाचे प्री-ऑर्डर सुरू

भारतात या पुस्तकाचे प्रकाशन कोण करणार यासंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली असली, तरी ‘ॲमेझॉन’ या ई-कॉमर्स ॲपवर या पुस्तकाच्या ई-बुकची प्री-ऑर्डर सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. प्री-ऑर्डरसाठी २,६१५ रुपये एवढी किंमत ॲपवर दिसत आहे.

काँग्रेस नेत्यांची टीका

पुस्तकाच्या प्रकाशनावरून निर्माण झालेल्या वादावरून काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले की, “दबाव टाकून पुस्तकाचे प्रकाशन रोखण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची हत्या आहे.” नरेंद्र मोदी, आरएसएस आणि मोदी सरकारच्या काळात चीनने बळकावलेल्या भूभागासंदर्भातील भाग पुस्तकातून हटवण्यासाठी ‘पेंग्विन इंडिया’वर दबाव होता, असा आरोप गेहलोत यांनी केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनीही पेंग्विन इंडियावर टीका करताना, “सोनिया गांधी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने पुस्तकात काय लिहावे, हे प्रकाशक ठरवणार का?” असा सवाल उपस्थित केला.

Comments are closed.