डॉक्टर-परिचारकांना मारहाण व तोडफोड प्रकरण : रुग्णालयात धुडगूस घातला, आता शहरातून काढली ‘धिंड’!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महागाव येथील ग्रामीण रुग्णालयात घुसून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करत तोडफोड करणाऱ्या आरोपींवर महागाव पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची शहरातील प्रमुख मार्गांवरून पोलिसांनी धिंड काढली. ठाणेदार सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे.

काही दिवसांपूर्वी अंबोडा येथील एक जखमी तरुण उपचारासाठी महागावच्या ग्रामीण रुग्णालयात आला होता. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. मात्र, उपचाराबाबत वाद निर्माण झाल्यानंतर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मध्यरात्री रुग्णालयात धुडगूस घातल्याचा आरोप आहे. आरोपींनी पुरुष परिचारकाला मारहाण केली तसेच रुग्णालयातील काचा फोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महिला डॉक्टर आणि परिचारिकांनी सुरक्षेसाठी प्रसूती कक्षातील बाथरूममध्ये आश्रय घेतल्याची माहितीही समोर आली होती.

ठाणेदारांची धडक कारवाई

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार सेवानंद वानखेडे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण आणि तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपींना अटक केली.

शहरातून काढली धिंड

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा आणि शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर संदेश जावा, या उद्देशाने अटक आरोपींची महागाव शहरातील प्रमुख मार्गांवरून धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, “कायद्याला हात घालणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा संदेश पोलिसांनी दिल्याची चर्चा आहे. या कारवाईचे नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही स्वागत केले आहे.

Comments are closed.