Ratnagiri News – पेढांबे ब्रिजवर वाहतूक कोंडीचा विळखा; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ त्रस्त
चिपळूण तालुक्यातील पेढांबे ब्रिजवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, पुलावरील खड्डे आणि वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ यामुळे स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निदर्शनास आणूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पेढांबे ब्रिज हा एकेरी वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या मार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यातच पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची वर्दळ वाढल्याने ही समस्या आणखी गंभीर बनली आहे.
दरम्यान, पिंपळी येथील ब्रिज कोसळल्यामुळे खडपोली औद्योगिक वसाहतीकडे जाणारी जड वाहतूक रात्री ११ नंतर सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसा मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या मार्गावरून जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पेढांबे ब्रिज परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असून, त्याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे.
शासनाने वाहतुकीसंदर्भात दिलेले नियम व निर्देश प्रत्यक्षात पाळले जात आहेत का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या समस्येबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वाहतूक कोंडी, पुलावरील खड्डे आणि दिवसा सुरू असलेली अवजड वाहतूक यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने अवजड वाहतुकीचे नियमन करावे, पुलावरील खड्डे बुजवावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.अन्यथा खडपोलीकडे जाणारा रस्ताच बंद करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडून आता कोणती भूमिका घेतली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.