साय-फाय – विश्वाचा नवा नकाशा उलगडणार
>> प्रसाद ताम्हणकर
[email protected]
विश्वाची निर्मिती कशी झाली, त्याचा विस्तार नेमका कसा वाढत आहे आणि आपल्या आकाशगंगेबाहेर किती ग्रह आहेत, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी नासाची नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप आता सज्ज झाली आहे. या अत्याधुनिक अवकाश दुर्बिणीचे प्रक्षेपण 30 ऑगस्ट 2026 रोजी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे करण्याचे नियोजन आहे. हबल दुर्बिणीच्या तुलनेत रोमनचा आकाशाकडे पाहण्याचा परिसर तब्बल 100 पट मोठा असेल.
रोमन दुर्बिणीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे तिची मोठी निरीक्षण क्षमता आणि अवरक्त प्रकाश पाहण्याची ताकद. हबलप्रमाणेच ती सूक्ष्म तपशील टिपू शकते. मात्र तिचे विस्तीर्ण दृश्य क्षेत्र असल्यामुळे ती हबलपेक्षा सुमारे 1,000 पट वेगाने आकाशाचे सर्वेक्षण करू शकेल. आपल्या पाच वर्षांच्या प्राथमिक मोहिमेत रोमन अब्जावधी आकाशगंगांमधून येणाऱया प्रकाशाचा अभ्यास करणार आहे. या माहितीच्या आधारे आकाशगंगा, तारे आणि ग्रहांची निर्मिती व उक्रांती कशी झाली, याचा अधिक व्यापक मागोवा घेता येईल.
रोमनच्या मोहिमेचा एक प्रमुख उद्देश डार्क एनर्जी आणि डार्क मॅटरचा अभ्यास हा आहे. विश्वाच्या विस्ताराचा वेग वाढत असल्याचे निरीक्षणातून दिसते. त्यामागे नेमकी कोणती शक्ती कार्यरत आहे, हा आधुनिक खगोलशास्त्रातील मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर विश्वातील पदार्थाच्या रचनेत डार्क मॅटरची भूमिका काय आहे, हे समजून घेण्यासाठीही रोमन महत्त्वाची माहिती देईल. अतिदूर वस्तूंच्या प्रकाशावर गुरुत्वाकर्षणामुळे होणारे सूक्ष्म बदल मोजून विश्वातील पदार्थाची रचना आणि त्याचा काळानुसार झालेला बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही दुर्बिण आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रहांचाही मोठय़ा प्रमाणावर शोध घेणार आहे. रोमनच्या विस्तीर्ण निरीक्षण क्षेत्रामुळे हजारो नव्हे, तर सुमारे एक लाख नवीन बाह्यग्रह शोधण्याची क्षमता निर्माण होणार आहे. त्यापैकी काही ग्रहांबाबत त्यांच्या कक्षा, आकार आणि वातावरणाविषयी अधिक माहिती मिळू शकते. याशिवाय रोमन ग्रह तयार होत असलेल्या प्रदेशांचाही अभ्यास करणार असून काही मोठय़ा बाह्यग्रहांची थेट छायाचित्रे घेण्याच्या तंत्राची चाचणीही केली जाणार आहे.
रोमन दुर्बिण केवळ दूरवरच्या आकाशगंगांकडे पाहणार नाही, तर प्राचीन कृष्णविवरांचाही शोध घेईल. विश्वाच्या सुरुवातीच्या काळात अस्तित्वात असलेल्या अतिविशाल कृष्णविवरांची निर्मिती आणि वाढ कशी झाली, हा प्रश्नही या मोहिमेच्या अभ्यासाचा भाग आहे. त्यामुळे डार्क एनर्जी, डार्क मॅटर, बाह्यग्रह, कृष्णविवरे आणि आकाशगंगांची उक्रांती अशा अनेक क्षेत्रांना एकाच मोहिमेतून मोठी चालना मिळणार आहे. हबल आणि जेम्स वेब या दुर्बिणींच्या कामाला पूरक ठरत रोमन विश्वाचा आणखी विस्तीर्ण पट वैज्ञानिकांसमोर उघडेल.
रोमन दुर्बिणीचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तिच्या मदतीने आकाशातील बदलत्या वस्तूंचा दीर्घकाळ अभ्यास करता येणार आहे. काही तारे विशिष्ट काळानंतर तेजस्वी किंवा अंधुक होतात, तर काही ठिकाणी अचानक प्रचंड प्रकाश निर्माण होतो. अशा घटनांचा मागोवा घेऊन खगोलशास्त्रज्ञांना विश्वातील विविध प्रक्रियांची अधिक अचूक माहिती मिळू शकते. बाह्यग्रहांच्या शोधासाठीही ही क्षमता महत्त्वाची ठरणार आहे. एखादा ग्रह आपल्या ताऱयासमोरून जाताना त्या ताऱयाच्या प्रकाशात होणारा अतिशय सूक्ष्म बदल रोमन टिपू शकते. विशेष म्हणजे रोमनकडून मिळणारी माहिती इतर अवकाश दुर्बिणींच्या निरीक्षणांना पूरक ठरणार असल्याने एखाद्या वस्तूचा विस्तृत अभ्यास करणे वैज्ञानिकांना अधिक सोपे होईल. त्यामुळे ही दुर्बिण केवळ आणखी एक अवकाश दुर्बिण न राहता विश्वाच्या इतिहासाकडे पाहण्याची नवी खिडकी ठरण्याची शक्यता आहे.
Comments are closed.