Asian Games 2026 – स्पर्धेपूर्वी व्यवस्थेचा पर्दाफाश, क्रिकेटपटूंची 20 किमी लांब राहण्याची व्यवस्था
पुढील महिन्यात जपानमध्ये होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वीच व्यवस्थेचा पर्दाफाश झाल्याचे समोर आले आहे. कारण क्रिकेटपटूंची स्टेडियमपासून तब्बल 20 किलोमीटर लांब राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. खेळाडू आणि अधिकाऱयांची संख्या अंदाजित संख्येपेक्षा जास्त होऊन सुमारे 17,000 वर पोहोचली आहे. ज्यामुळे आयोजकांसमोर निवासाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
आशियाई स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान होणार आहेत. आशियाई खेळांमधील क्रिकेटचे सामने कोरोगी स्पोर्टस् पार्क येथे खेळले जातील. हे खरे तर बेसबॉलचे मैदान होते, ज्याचे क्रिकेटसाठी रूपांतर करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानसह अनेक आशियाई संघ या मैदानावर खेळतील. कोरोगी स्पोर्टस् पार्कपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर क्रिकेटपटूंच्या निवासाची व्यवस्था केली जात आहे.
सर्वात मोठी चिंता खोल्यांच्या आकाराची आहे. खेळाडूंना सामायिक खोल्यांमध्ये ठेवले जाऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सामानासाठी आणि क्रिकेट किटसाठी अपुरी जागा निर्माण होऊ शकते. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, खोल्या खूपच लहान आहेत. जर एखाद्या खेळाडूने आपली किट बॅग उघडली, तर खोलीत उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा उरणार नाही. संघ या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
Comments are closed.