रडण्याचा आवाज ऐकू आला अन् जवानांनी खोदले; नेपाळच्या पुरात तीन दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात विनाशकारी पुरानंतर बचावकार्य सुरू असताना एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. तिमुरे गावात पुराच्या चिखल आणि ढिगाऱ्याखाली तब्बल तीन दिवस अडकलेल्या सहा वर्षांच्या मुलीला बचाव पथकाने शुक्रवारी संध्याकाळी सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे भीषण पुराच्या संकटात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
रसुवा जिल्ह्यातील तिमुरे गावाला भोटे कोशी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला. पुरानंतर बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सशस्त्र पोलीस दलाचे (APF) जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत होते. याचदरम्यान जवानांना मातीच्या ढिगाऱ्याखालून एका मुलीच्या रडण्याचा क्षीण आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जवानांनी तातडीने खोदकाम सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्याखालून सहा वर्षांच्या मुलीला जिवंत बाहेर काढले. तब्बल तीन दिवस ती ढिगाऱ्याखाली अडकूनही जिवंत राहिल्याने बचाव पथकातील जवानांसह स्थानिकांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.
एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार सुटकेनंतर मुलीला तिमुरे येथील APF सीमा चौकीवर प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र, तिची प्रकृती खालावू लागल्याने तिला तातडीने उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी तिला विमानाने काठमांडूला नेण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. त्यानंतर शनिवारी हवामानात सुधारणा झाल्यानंतर बचाव पथकाला तिला हेलिकॉप्टरने काठमांडूला हलवण्यात यश आले. सध्या या सहा वर्षांच्या मुलीवर काठमांडू येथील रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून आवश्यक उपचार केले जात आहेत.
मुलीच्या सुटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तीन दिवसांनंतरही शोधकार्य सुरू ठेवून मुलीला जिवंत बाहेर काढल्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यांनी APF जवानांचे कौतुक केले. दरम्यान, मुलीची ओळख मनीषा मगर अशी असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.
प्रशासनाकडून तिच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 675 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती देण्यात आली असून, 2 हजार 400 हून अधिक नागरिक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होण्याची शक्यता असल्याचे नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे. प्रशासनाकडून सध्या नुकसानग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
Comments are closed.