आशिया कपमध्ये भारताची दणदणीत सुरुवात! थायलंडचा 94 धावांनी धुव्वा

एसीसी (ACC) महिला आशिया कप 2026 मधील आपल्या सलामीच्या सामन्यात भारताचा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थायलंडशी झाला. भारतीय संघाने दमदार कामगिरी करत थायलंडचा 94 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.
थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र, त्यानंतर थायलंडच्या गोलंदाजांनी किफायती गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना रोखून धरले. भारताने मर्यादित 20 षटकांत 9 बाद 159 धावा केल्या आणि थायलंडसमोर विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले.
थायलंडतर्फे सुलिपोर्न लाओमीने सर्वाधिक तीन बळी घेतले. भारतासाठी सलामीवीर शेफाली वर्माने शानदार अर्धशतक झळकावले, तिने 36 चेंडूंत 64 धावांची आक्रमक खेळी केली, ज्यामध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. शेफाली बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी काहीशी डगमगली असली, तरी संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले.
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडच्या फलंदाजांची भारतीय गोलंदाजीसमोर चांगलीच दमछाक झाली. संपूर्ण थायलंड संघ 16.1 षटकांत केवळ 65 धावांत सर्वबाद झाला, ज्यामुळे भारताने 94 धावांनी दणदणीत विजय मिवला.
आता भारतीय संघ 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँगविरुद्ध आपला दुसरा सामना खेळणार आहे. महिला आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. संघाने आतापर्यंत सात वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळेच, या वर्षी आठव्यांदा आशिया कप जिंकण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे.
Comments are closed.