‘हनुमान अंश’चे तिकीटबारीवर तुफान… 2 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाचा ‘स्त्री-2’, ‘छावा’, ‘जवान’ला धोबीपछाड; 1900 टक्के नफा

बॉक्स ऑफिसचे गणित कधी कसे बदलेल, याचा अंदाज लावणे कठीण असते. कोणतीही प्रसिद्धी नाही, सोशल मीडियावर चर्चा नाही आणि पहिल्याच दिवशी अवघी 10 लाख रुपयांची कमाई… अशी सुरुवात झालेला ‘हनुमान अंश’ हा चित्रपट सुरुवातीच्या दोन आठवड्यांत पूर्णपणे फ्लॉप मानला जात होता. दोन आठवड्यांत या चित्रपटाने अवघे 1.48 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण, तिसऱ्या आठवड्यापासून या चित्रपटाने तिकीटबारीवर असा काही चमत्कार घडवला आहे की, भल्याभल्या मोठ्या चित्रपटांचे गणित कोलमडले आहे.

पहिल्या दोन आठवड्यांनंतर तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने थेट 10.40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सैकनिल्कच्या अहवालानुसार, चौथ्या आठवड्यातील शुक्रवारी चित्रपटाने 6.25 कोटी आणि शनिवारी 9.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 24 व्या दिवशी या चित्रपटाने तुफान कमाई करत देशात 47.33 कोटींचा गल्ला जमवला आहे. केवळ 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आपल्या मूळ खर्चाच्या तुलनेत 1906.50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा बहुचर्चित ‘टॉक्सिक’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळत आहे, तर इम्रान हाश्मी याचा ‘आवारापन-2’ हा चित्रपटही कमाईसाठी झगडत आहे. असा परिस्थितीत हनुमान अंशने रविवारी ‘आवारापन-2’ पेक्षा बारा पट अधिक करत सर्वांना अचंबित केले. ‘हनुमान अंश’ने रविवारी केलेल्या कमाईच्या जोरावर बॉलिवूडच्या ‘स्त्री 2’, ‘छावा’ आणि ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

‘हनुमान अंश’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. ही कथा प्रसिद्ध संत नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शोभिनाव सत्या यांनी संत नीम करौली बाबा यांची मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत विहान शेज, चंदन के. आनंद, पूर्णिमा तिवारी, अनिल रस्तोगी, गुलशन पांडे, भगवानदास पटेल आणि राजीव मिश्रा या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका निभावल्या आहेत.

दरम्यान, संत नीम करौली बाबा यांचा आश्रम उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे आहे. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स, मेटाचे मार्क जुकरबर्ग, तसेच क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या दिग्गज संत नीम करौली बाबांच्या दर्शनाला गेल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे.

Comments are closed.