सुसाट कार वाहतूक पोलिसांच्या चौकीत घुसली, बेलापूरमध्ये दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सायन-पनवेल मार्गावरून जात असलेली सुसाट कार लोखंडी रेलिंग तोडून वाहतूक पोलिसांच्या चौकीत घुसल्याची घटना शनिवारी सीबीडी बेलापूरमध्ये घडली. या अपघातात चौकीच्या खोलीची भिंत कोसळून खोलीत असलेल्या फर्निचरचे नुकसान झाले. अपघात घडला त्यावेळी खोलीत कोणीच नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

खारघर येथील सेक्टर ६ मधील केसर हार्मोनी सोसायटीत राहणारा अमित शर्मा (३६) हा शनिवारी पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आपली ‘किया सोनेट’ कार घेऊन मुंबईकडून खारघरच्या दिशेने जात होता. तो सीबीडी उड्डाणपुलाखालील चौकात आला असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव असलेली कार रस्त्यावरील लोखंडी रेलिंग तोडून वाहतूक पोलीस चौकीच्या शेजारील खोलीच्या भिंतीवर जोरदार जाऊन धडकली.

अपघातात खोलीची भिंत पडल्याने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून कारचा पुढचा भागही चक्काचूर झाला आहे. सीबीडी बेलापूर पोलिसांनी पोलीस हवालदार साईनाथ सोनावणे (४४) यांच्या तक्रारीवरून कारचालक अमित शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि कारचालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Comments are closed.