आनंदाची बातमी! अफगाणिस्तान मालिकेआधी टीम इंडियाचे तिन्ही अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे फिट

भारतीय क्रिकेट संघाची पुढची मालिका अफगाणिस्तानविरुद्ध असणार आहे. तथापि, टीम इंडिया अफगाणिस्तानला जाणार नाही, तर अफगाणिस्तान दिल्लीत भारतीय संघाचे यजमानपद भूषवणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेची सुरुवात 13 सप्टेंबरपासून होणार असून, याचे यजमानपद अफगाणिस्तानकडे असेल. या मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताचे तीन स्टार अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे फिट झाले आहेत.
वृत्तानुसार, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि युवा अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी आता पूर्णपणे फिट आहेत. नितीश रेड्डी सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये जोरदार सराव करत आहेत. या दोघांव्यतिरिक्त स्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर हादेखील या मालिकेपूर्वी फिट होईल आणि निवडीसाठी उपलब्ध असेल.
13 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआय (BCCI) या आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार, हे तिन्ही खेळाडू या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतात. पांड्या आणि रेड्डी हे दोघेही गेल्या बऱ्याच काळापासून ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये असून सतत सराव करत आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना (13 सप्टेंबर) रोजी खेळवला जाईल. यानंतर दुसरा टी-20 सामना 15 सप्टेंबरला आणि तिसरा तसेच शेवटचा टी-20 सामना 17 सप्टेंबरला होईल. हे तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील.
दरम्यान, अफगाणिस्तानने या टी-२० मालिकेसाठी आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरान या मालिकेतून आपल्या कर्णधारपदाची सुरुवात करणार आहे. तसेच त्यांच्या संघात वरिष्ठ आणि युवा खेळाडूंचा चांगला मेळ पाहायला मिळत आहे.
Comments are closed.