ओल्ड माँकच्या बाटलीवरून‘7 वर्षं जुनी’ उल्लेख हटवणार, हायकोर्टाच्या दणक्यानंतर नशा उतरली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

प्रसिद्ध रम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओल्ड मॉंकची हायकोर्टाने अखेर नशा उतरवली आहे. उत्पादनाच्या लेबलवर ‘सेव्हन इयर्स ओल्ड ब्लेंडेड’ आणि ‘व्हेरी ओल्ड व्हॅटेड’ नमूद करत ग्राहकांची दिशाभूल केल्या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) घातलेल्या बंदीला तातडीने स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. हायकोर्टाच्या या दणक्यानंतर ताळ्यावर आलेल्या ओल्ड माँक उत्पादक कंपनीने बाटलीवरील ‘7 वर्षं जुनी’ हा उल्लेख हटवण्याची ग्वाही खंडपीठाला दिली.

एफएसएसएआयने लेबलिंग नियमांचे उल्लंघन तसेच रमच्या वयाबाबत दिशाभूल करणारे दावे केल्याच्या कारणावरून ‘ओल्ड माँक’च्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. याप्रकरणी ओल्ड माँकचे उत्पादन करणाऱ्या मोहन रॉकी स्प्रिंग वॉटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केंद्र सरकारसह अन्य काही जणांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून बंदी उठवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर आज सोमवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

ओल्ड माँकचे म्हणणे काय ?

ओल्ड मॉंक उत्पादक कंपनीच्या वतीने अॅड. नवरोझ सिरवई यांनी बाजू मांडताना सांगितले की, ब्लेंडेड स्पिरिटसंदर्भातील माहिती संबंधित नियमांनुसार लेबलवर देण्यात आली आहे. तसेच न्यूट्रल स्पिरिटमध्ये मान्यताप्राप्त फ्लेवरिंग पदार्थ वापरण्यास एफएसएसएआयच्या नियमांमध्ये परवानगी आहे. उत्पादनातील सर्व घटक लेबलवर नमूद केले असून केवळ ओल्ड मॉंकलाच लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले.

Comments are closed.