“राज्यात 2 कोटी, मुंबईत 36 लाख मतदार वगळले; जिथे विरोधकांना चांगले मतदान होते, तिथे…”, संजय राऊत कडाडले
राज्य निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून तयार केलेली प्रारुप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे उडवली गेल्याचे समोर आले असून यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार, निवडणूक आयोगावर हल्ला चढवत जिथे विरोधकांना चांगले मतदान होते, त्या भागातील मतदार कमी करण्याचे काम सुरू असल्याची टीका केली. मंगळवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राज्यातून 2 कोटी मतदार, तर मुंबईतून 36 लाख मतदार वगळले गेले आहेत. ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. पश्चिम बंगालमध्येही हेच केले. तिथे टीएमसीला मतदान करतील अशी शंका असलेले 85 लाख मतदार वगळले आणि भाजपने विजय मिळवला. महाराष्ट्रातील काही भागांमध्येही अशा प्रकारचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याच्यावर आमचाही रिसर्च सुरू आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबईत 36 लाख मतदार वगळणे हा सामान्य आकडा नाही. एका विशिष्ट समाजाचे, धर्माचे किंवा जिथे आपल्या विरोधकांना चांगले मतदान होते, त्या भागातील मतदार कमी करण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे. नवी मुंबईत भाजपच्या कार्यालयात एसआयआरचे बोगस फॉर्म कसे सापडले हे आपण पाहिले. प्रत्येक जिल्ह्यात, शहरात, विभागात हे झालेले आहे. त्याच्यावर आमचे लोक काम करत असून यंत्रणा कामाला लागली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार उडवले! ‘एसआयआर’ची कमाल! निवडणूक आयोगाची धमाल!!
Comments are closed.