मोठी बातमी! मुंबईला मिळाला नवा कर्णधार, मराठमोळ्या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबईला सलग दुसऱ्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी नवा कर्णधार मिळाला आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड 2026-27 च्या हंगामात मुंबईचे नेतृत्वपद भुषवणार आहे. सिद्धेश हा शार्दुल ठाकुरची जागा घेणार आहे. शार्दुलने मागील देशांतर्गंत हंगामात सर्व फॉरमॅटमध्ये मुंबईचे नेतृत्व केले होते.
मुंबई क्रिकेटमधील या महत्त्वाच्या माहितीला मुंबई वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, “नेतृत्वाची सातत्यता आणि कामाच्या भाराचे व्यवस्थापन या दोन्ही बाबी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.”
“आम्ही 2026-27 च्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी सिद्धेश लाडची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तो अनुभवी खेळाडू असून त्याने मागील हंगामात उत्तम कामगिरी केली होती, तर शार्दुल आमचा सामना विजेता आहे,” असे पवार म्हणाले आहेत.
“शार्दुलवर अधिक ताण आहे. त्याच्याकडून भरपूर षटके गोलंदाजी करणे, विकेट घेणे आणि त्याचबरोबर फलंदाजी करण्याचीही अपेक्षा असते. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर नेतृत्वपदाच्या जबाबदारीचे ओझे टाकायचे नाही. रणजी ट्रॉफीमध्ये 10 सामने आहेत आणि एखादेवेळी त्याला विश्रांतीही द्यावी लागेल,” असेही पवार यांनी शार्दुलच्या जबाबदारीचे स्पष्टीकरण दिले.
तसेच पवार यांनी नेतृत्वबदलाचा निर्णय दोन्ही खेळाडूंशी चर्चा करूनच घेण्यात आला असेही सांगितले आहे. ते म्हणाले, “आम्ही सिद्धेश आणि शार्दुल दोघांशीही याबाबत चर्चा केली. दोघांनीही सकारात्मकता दर्शवली. ऑक्टोबरमध्ये चार सामन्यांनी रणजी ट्रॉफीच्या नव्या हंगामाची सुरूवात होत आहे. त्यामुळे आम्हाला कर्णधारपदाबाबत स्पष्टता हवी होती.”
सिद्धेशची 2025-26 रणजी ट्रॉफी हंगामातील कामगिरी
34 वर्षीय सिद्धेश 2025-26 च्या रणजी ट्रॉफी हंगामामध्ये मुंबईसाठी महत्त्वाचा खेळाडू ठरला. त्याने 8 सामन्यांमध्ये 77.40 च्या प्रभावी सरासरीने 774 धावा केल्या. यामध्ये 5 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. यामुळे तो त्या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
तसेच सिद्धेश 2025-26 च्या रणजी ट्रॉफी हंगामामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या स्थानावर राहिला. त्याचबरोबर या हंगामामध्ये सर्वाधिक शतकेही त्यानेच केली होती.
सिद्धेशची प्रथम श्रेणीमधील एकूण कामगिरी पाहिली तर त्याला 82 सामन्यांचा अनुभव आहे. यामध्ये त्याने 44.27 च्या सरासरीने आणि 15 शतके, 30 अर्धशतकांच्या सहाय्याने 5623 धावा केल्या आहेत.
मुंबईच्या नव्या रणजी हंगामाचे वेळापत्रक
मुंबई 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान वानखेडे स्टेडियमवर चंदीगडविरुद्ध आपल्या नव्या रणजी ट्रॉफी हंगामाची सुरूवात करणार आहे. त्यांचा एलिट डी गटात समावेश असून यामध्ये चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, रेल्वे, तामिळनाडू आणि उत्तराखंड हे संघ आहेत.
मुंबईने विक्रमी 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली आहे. त्यांनी शेवटची रणजी ट्रॉफी 2023-24 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. (मुंबईसाठी नवीन कर्णधार, सिद्धेश लाड रणजी ट्रॉफी 2026-27 हंगामात मुंबईचे नेतृत्व करेल)
Comments are closed.