पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, इंग्लंडमधील लाजीरवाण्या पराभवानंतर ‘या’ दिग्गजाची टीमला सोडचिट्ठी!

पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड मालिकेदरम्यान दिग्गज क्रिकेटपटू मिस्बाह-उल-हक्कने निवड समितीचा (सेलेक्शन कमिटी) राजीनामा दिला आहे. अहवालानुसार, मिस्बाहने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे (PCB) आपला राजीनामा सोपवला आहे. इंग्लंड मालिकेतून खेळाडूंना संघातून वगळण्यापूर्वी आणि त्यांचे पर्याय जाहीर करण्यापूर्वी त्याला कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नव्हती, हे या राजीनाम्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंतच्या चार डावांमध्ये संघाची धावसंख्या अनुक्रमे १७१, १३५, ११० आणि १९४ अशी राहिली आहे. चार डावांमध्ये एकदाही त्यांना २०० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही, जी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तान संघातील ७ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. मोहम्मद रिझवानपासून ते सलमान आघापर्यंत सर्वांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे, कोचिंग स्टाफमधून सरफराज अहमद आणि उमर गुल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींनंतर मिस्बाह-उल-हक्कचा राजीनामा हा पाकिस्तान क्रिकेटसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अंतर्गत सूत्रांनीही मिस्बाह-उल-हक्कचा राजीनामा प्राप्त झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मिस्बाहनंतर असद शफीकदेखील निवड समितीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडलेला इमाम-उल-हक्क लाहोरला परतला आहे. अल्लामा इक्बाल विमानतळावर उतरल्यानंतर त्याने चेहऱ्यावर मास्क लावला होता आणि तो कोणाशीही न बोलता शांतपणे स्वतःच्या घराकडे रवाना झाला. दुसरीकडे, अराफत मिन्हास लवकरच संघात सामील होऊ शकतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान इमामने दुखापतीचे नाटक केले होते, असा आरोपही त्याच्यावर केला जात आहे.
Comments are closed.