विराट-वॉर्नरच्या पंक्तीत क्विंटन डी कॉक! टी-20 मध्ये केला मोठा विक्रम

कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) च्या चालू हंगामातील 23वा सामना सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स आणि बार्बाडोस ट्रायडेंट्स यांच्यात खेळला गेला. सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने हा सामना 6 गडी राखून जिंकला. मात्र, बार्बाडोससाठी दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने फलंदाजीत चमकदार कामगिरी करत शतक (57 चेंडूत 106 धावा) झळकावले. या शतकासह, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डी कॉकने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांची बरोबरी केली आहे.
बार्बाडोस ट्रायडेंट्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, क्विंटन डी कॉकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्याने 57 चेंडूत 106 धावा करत आपले शतक पूर्ण केले. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता.
डी कॉकच्या टी-20 कारकिर्दीतील हे 10 वे शतक ठरले. परिणामी, टी-20 क्रिकेटमध्ये 10 शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पंक्तीत सामील झाला आहे. या यादीत ख्रिस गेल 22 शतकांसह अव्वल स्थानावर आहे, तर बाबर आझम 13 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
ख्रिस गेल – 22
बाबर आझम – 13
क्विंटन डी कॉक – 10*
विराट कोहली – १०
डेव्हिड वॉर्नर – 10
प्रथम फलंदाजी करताना, क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर बार्बाडोस ट्रायडेंट्सने 20 षटकांत 4 बाद 217 धावांची मजल मारली. मात्र, सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सने या मोठ्या आव्हानाचा यशस्वी आणि दमदार पाठलाग केला. जॉन्सन चार्ल्सने 45 चेंडूत 78 धावांची धडाकेबाज खेळी करत विजयाचा पाया रचला.
पॅट्रियट्सने अवघ्या 19.1 षटकांत 4 बाद 218 धावा करत हा सामना जिंकला. ज्यामध्ये दासुन शनाकाने 22 चेंडूंत 36 धावा केल्या, तर आंद्रे फ्लेचरने अवघ्या 8 चेंडूंत नाबाद 22 धावांची खेळी केली. वनिंदू हसरंगानेही केवळ 4 चेंडूंत नाबाद 18 धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Comments are closed.