दक्षिण विभागाची फायनलमध्ये धडक; तिलक वर्मा, निघीश यांची विजयात चमक, उत्तर विभागाचा सात विकेट्स राखून उडवला धुव्वा
तिलक वर्माच्या संयमी अर्धशतकाला एम. डी. निघीशच्या भेदक गोलंदाजीची साथ मिळाल्याने दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा सात विकेट्स राखून धुव्वा उडवत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 6 सप्टेंबरपासून चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम लढतीत दक्षिण विभागापुढे ईशान किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाचे आव्हान असेल.
उत्तर विभागाने विजयासाठी दिलेल्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण विभागाची सुरुवात डळमळीत झाली. सलामीवीर रिकी भुई आणि एन. जगदीशन यांनी 64 धावांची भागीदारी केली, मात्र अवघ्या आठ चेंडूंत दोन गडी बाद झाल्याने दक्षिण विभाग अडचणीत आला. शेख रशीदला दुसऱ्या डावातही केवळ एक धाव करता आली. या संकटातून तिलक वर्मा आणि आर. स्मरण यांनी संघाला बाहेर काढले. तिलकने नाबाद 51 धावांची झुंजार खेळी केली, तर स्मरण 31 धावांवर नाबाद राहिला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 80 धावांची भागीदारी करत दक्षिण झोनचा विजय निश्चित केला. तिलकची ही स्पर्धेतील दुसरी निर्णायक खेळी ठरली. पहिल्या डावात त्याने नाबाद 116 धावांची शानदार शतकी खेळी केली होती. त्यामुळे अडचणीच्या वेळी संघाचा किल्ला लढविणारा फलंदाज म्हणून त्याने आपली छाप पाडली.
निघीशने चेहरा फिरविला
सामन्याचा खरा टार्ंनग पॉइंट ठरला तो उत्तर विभागचा कोसळलेला दुसरा डाव. 2 बाद 175 अशा भक्कम स्थितीत असलेल्या उत्तर विभागाला एम. डी. निघीश आणि श्रेयस गोपाळ यांनी जोरदार धक्के दिले. उत्तर विभागाने अवघ्या 34 धावांत पाच गडी गमावले आणि सामन्याचे पारडे दक्षिण विभागाच्या बाजूने झुकले. निघीशने तब्बल 56 धावांत पाच गडी बाद करत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दहाव्यांदा बळींचा पंच लगावला. त्याने पहिल्या सत्रातच उत्तर विभागाचे तीन गडी टिपत त्यांच्या डावाला खिंडार पाडले.
उत्तर विभागाकडून सनत सांगवानने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर दोसेजाने 52 धावा केल्या. अखेरीस अंशुल पंबोज आणि निशांत सिंधू यांनी आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी करत संघाची आघाडी शंभरच्या पुढे नेली, मात्र तोपर्यंत दक्षिण विभागाच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली होती. दक्षिण विभागाकडून विद्वथ कावेरेप्पाने पहिल्या डावात चार बळी घेत उत्तर विभागाला 195 धावांत गुंडाळले. त्यानंतर निघीशच्या भेदक माऱ्याने उत्तर विभागाचा दुसरा डाव 297 धावांत आटोपला.
Comments are closed.