प्रशिक्षणादरम्यान बोट उलटल्याने लष्कराचे दोन सैनिक बेपत्ता
एक जण महाराष्ट्रातील : हरियाणातील हाथिनीकुंड बॅरेजमध्ये दुर्घटना
वृत्तसंस्था/यमुनानगर
हरियाणातील यमुनानगर येथील हाथिनीकुंड बॅरेजवर सरावादरम्यान यमुनेत बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोन जवानांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. बेपत्ता जवानांमध्ये महाराष्ट्रातील आर्यन पाटील आणि जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथील रहिवासी अजय यांचा समावेश आहे. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल, स्थानिक पोलीस आणि नागरी प्रशासन एक मोठी शोध आणि बचाव मोहीम राबवत आहे. सुमारे 10 पथके 15 किलोमीटरच्या परिघात सैनिकांचा शोध घेत आहेत. जवानांच्या शोधार्थ बुधवारी दिवसभर 15 किमी परिसरात शोधमोहीम सुरू होती. लष्कराच्या तुकड्यांनी 10 हून अधिक पाण्याच्या प्रवाहाची ठिकाणी निगराणी तैनात केली आहे. सरावादरम्यान, जवानांनी चिनूक हेलिकॉप्टरमधून यमुनेत नांगरलेल्या बोटीवर उडी मारली. याचदरम्यान बोट हेलावू लागल्याने ती बुडाली.
ऑक्सिजन आणि लाईफ जॅकेट घातलेल्या पाच जवानांनी नदीत उडी मारली. तीन जवान 600 मीटर पोहून यमुना कालव्याच्या गेटमधून बाहेर आले, परंतु दोघे अद्याप सापडलेले नाहीत. हाथिनीकुंड धरणाजवळ लष्कराच्या विशेष दलाची बोट बुडाल्यानंतर यमुना नदीत बेपत्ता झालेल्या दोन सैनिकांचा शोध सुरू आहे. रात्रभर लष्कराच्या अनेक तुकड्यांमधील जवानांनी, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील एनडीआरएफच्या पथकांसह आणि अनेक डायव्हर्सनी यमुना नदीत शोध घेतला. सैनिकांनी धरणाच्या मागे आणि पलीकडे सुमारे दहा किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. बुधवार दुपारपर्यंत बेपत्ता सैनिकाचा कोणताही मागमूस लागला नव्हता. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात झाल्यापासून हाथिनीकुंड धरणापासून यमुना नदीच्या खालच्या भागात सतत शोधमोहीम सुरू आहे. एनडीआरएफची पथके लष्करी जवानांसोबत यमुना नदीतील संभाव्य ठिकाणांचाही शोध घेत आहेत. तथापि, लष्कराने अद्याप दोन जवान बुडाल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही.
Comments are closed.