‘हनुमान अंश’ चित्रपट 11 सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार
हिंदुस्थानात अनपेक्षितपणे दमदार कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई करणारा ‘हनुमान अंश’आता थेट जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नीम करोली बाबांच्या जीवन आणि शिकवणीवर आधारित या चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची घोषणा केली. 11 सप्टेंबरला ‘हनुमान अंश’ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित या चित्रपटाला हिंदुस्थानामध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत हा आध्यात्मिक प्रवास पोहोचवण्याची तयारी करण्यात आली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत ही माहिती दिली. ‘हनुमान अंश’ची बॉक्स ऑफिसवरील सुरुवात मात्र फारशी प्रभावी नव्हती. पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे 10 लाख रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे चित्रपटाने हळूहळू वेग पकडला.
सुमारे 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने हिंदुस्थानात 24 दिवसांत 40 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यानंतर चित्रपटाने 50 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्यामुळे कमी चर्चेत प्रदर्शित होऊन नंतर दमदार कमाई करणारा स्लीपर हिट म्हणून या चित्रपटाची चर्चा होत आहे. ‘हनुमान अंश’ची कथा हिंदू आध्यात्मिक गुरू आणि भगवान हनुमानाचे निस्सीम भक्त म्हणून ओळखले जाणारे नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित आहे. हिंदुस्थानातील यशानंतर 11 सप्टेंबरला हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकडून त्याला कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.