छत्रपती संभाजीनगरमध्ये एशियन हॉस्पिटलच्या NICU मध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण सुखरूप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (NICU) ही आग लागली. आग लागली त्यावेळी विभागात बालकांवर उपचार घेत होते. सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

प्राथमिक माहितीनुसार, एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा मोठा धोका टळला.

9 बालकांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवले

आगीच्या वेळी NICUमध्ये उपचार घेत असलेल्या बालकांना तातडीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ज्या पहिल्या मजल्यावर आग लागली, त्या ठिकाणी एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये NICUतील 8 बालकांसह जनरल विभागातील 36 आणि स्पेशल रूममधील 13 रुग्णांचा समावेश होता. सर्व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

30 रुग्णवाहिका घटनास्थळी

बचावकार्याला वेग देण्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवाहरनगर पोलीस, आरसीपीचे जवान, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे बचावकार्य राबवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Comments are closed.