INDW vs PAKW: स्मृती मानधना फक्त इतक्या धावा करताच रचणार इतिहास! पाकविरुद्ध आणखी एक विश्वविक्रम करण्याची संधी

भारतीय महिला संघाची (Indian cricket women’s team) दिग्गज फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तिने महिला आशिया कपमध्ये (Women’s Asia Cup) हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावले. या सामन्यात तिने 64 चेंडूत 124 धावांची खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या आशिया कपमध्ये भारतीय महिला संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात सुद्धा स्मृतीकडे एक जागतिक विक्रम करण्याची संधी असेल.
स्मृती पुढच्या सामन्यात 78 धावा करताच महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Women’s T20I) सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनेल. महिला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे तर, सध्या न्यूझीलंडची दिग्गज फलंदाज सूजी बेट्स पहिल्या स्थानावर आहे. तिने आपल्या कारकिर्दीत 186 टी-20 सामन्यांमध्ये 28.33 च्या सरासरीने 4758 धावा केल्या आहेत. तर स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर आहे. मानधनाने आतापर्यंत टी-20 सामन्यांमध्ये 173 डावांत 30.79 च्या सरासरीने 4681 धावा केल्या आहेत. स्मृती मानधनाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 78 धावा केल्या, तर ती महिला टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरेल.
या यादीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) तिसऱ्या स्थानावर आहे. तिने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 204 सामन्यांत 4231 धावा केल्या आहेत. श्रीलंकेची फलंदाज चमारी अट्टापट्टू या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. तिने आतापर्यंत 167 सामन्यांत 26.58 च्या सरासरीने 4094 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाइनचे नाव पाचव्या स्थानावर असून, तिने 158 सामन्यांत 3817 धावा केल्या आहेत.
महिला आशिया कप 2026 मधील स्मृती मानधनाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर, तिने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. थायलंडविरुद्धच्या सामन्यात ती केवळ 19 धावा करून बाद झाली होती. तर हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात तिने 124 धावांची धमाकेदार खेळी केली.
स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हा सामना 5 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
Comments are closed.