लाखमोलाच्या हंड्यांसाठी आज थरांचा थरार, ‘दस का दम’ दाखवण्यासाठी गोविंदा सज्ज

‘बोल बजरंग बली की जय’, ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने उद्या मुंबईसह ठाणे अक्षरशः दुमदुमून जाणार आहे. जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान गोविंदा पथक गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘दस का दम’ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत, तर ‘हम भी किसी से कम नही’ म्हणत गोपिकांनीही सात थर लावण्याचा निर्धार केला आहे. नाक्यानाक्यावर उभारण्यात आलेल्या लाखमोलाच्या दहीहंड्या फोडून बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार असून थरांचा हा थरार ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवण्यासाठी नागरिकांचाही मोठी गर्दी उसळणार आहे.

गुरुपौर्णिमेपासूनच मुंबईसह ठाण्यातील गोविंदा पथके सरावाला सुरुवात करतात. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर उद्या दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथक सज्ज झाली असून त्यांच्या ताकदीची, संतुलनाची आणि सांघिक काwशल्याची खरी कसोटी लागणार आहे. अनेक आयोजकांनी आपल्या दहीहंडी उत्सवासाठी लाखो रुपयांची पारितोषिक जाहीर केली आहेत. त्यामुळे गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईत यंदाही ताडदेव, वरळी, दादर, बोरिवली, दिंडोशी, घाटकोपर, मुलुंड अशा विविध ठिकाणी थरांचा थरार रंगणार आहे. सकाळपासून मुंबईतील मानाच्या दहीहंड्या फोडत गोविंदा पथके दुपारनंतर ठाण्याच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे सकाळी मुंबईत आणि दुपारनंतर ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष दिसेल.

ट्रिपलसीट, विना हेल्मेट असल्यास कारवाई

गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथके विविध ठिकाणी जात असतात बरेच गोविंदा दुचाकी वरून ट्रिपल सीट जातात तर बरेच जण हेल्मेटचा वापर करत नाहीत. याशिवाय सोबत असलेली लहान मुलं व तरुण ट्रकच्या टपवर बसून प्रवास करतात त्यामुळे याची गंभीर दखल घेत सर्व गोविंदा पथकाने काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

डिजे लावू नका, अफवा पसरू नका

गोकुळाष्टमीचा सण साजरा करत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व गोविंदा पथके व नागरिकांनी काळजी घ्यावी. मानवी मनोरे रचताना अल्पवयीन मुलांचा वापर कडू नका. कुठल्याही अफवा पसरवू नका किंवा अफावांवर विश्वास ठेवू नका. डीजे लावू नका असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दीडशे ते दोनशे कोटींची उलाढाल

गिरणगावातील पारंपरिक गोविंदा उत्सवाला ग्लोबल आणि कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झाले आहे. भलामोठे स्टेज, आकर्षक सजावट, उंच व्रेन, अत्याधुनिक साऊंड सिस्टम, प्रकाशयोजना, सेलिब्रेटींचे मानधन, गोविंदांच्या जेवणाची व्यवस्था, वाहतूक आणि इतर आयोजनांवर कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. दहीहंडीच्या या एका दिवसाच्या उत्सवातून मुंबई-ठाण्यात तब्बल दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.

Comments are closed.